‘पक्षशिस्तीचे पालन करून अपक्ष’ अशी नवी संकल्पना मांडत आम आदमी पक्षाने महापालिकेच्या प्रभाग क्र. ६३ (अ) मधील पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार उभा केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अधिकृतपणे सहभाग घ्यायचा नाही, या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या भूमिकेचे पालन केले असल्याने आमचा उमेदवार बंडखोर नसल्याचा दावाही पक्षातर्फे करण्यात आला आहे.
कोंढवा प्रभागातील पोटनिवडणुकीमध्ये राज फय्याज हे कार्यकर्ते अपक्ष उमेदवार म्हणून िरगणात आहेत. स्वच्छ राजकारण आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था यासाठी ‘आम आदमी’ला राजकारणात उतरले पाहिजे या तत्त्वाला अनुसरूनच ही निवडणूक लढविली जात असल्याचे पक्षाचे प्रवक्ते तन्मय कानिटकर यांनी सांगितले. सध्याची राजकीय परिस्थिती, महापालिकेमध्ये वाढलेला भ्रष्टाचार आणि धार्मिक-जातीय तेढ या पाश्र्वभूमीवर लोकांमधील आणि लोकांसाठी काम करणारा स्वच्छ उमेदवार असणे गरजेचे आहे. या निवडणुकीच्या नियोजनासाठी कार्यकर्त्यांनी आपल्यामधून एकमताने समितीची निवड केली आहे. या समितीच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली जात असल्याचे सांगून कानिटकर यांनी उमेदवाराच्या प्रचारामध्ये प्रा. सुभाष वारे यांनी सहभागी व्हावे, अशी विनंती केली असल्याचे स्पष्ट केले.