भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम, तीन लाखाहून अधिक नागरिकांचा सहभाग, कोटय़वधींची उलाढाल झालेल्या पिंपरी महापालिकेच्या पवनाथडी यात्रेचा मंगळवारी रात्री समारोप झाला.
सांगवीतील मैदानात ३० जानेवारीपासून सुरू झालेल्या पवनाथडीला पहिल्या दिवसापासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या प्रतिसादामुळे दोन दिवस मुदतवाढ देण्यात आली. सहा दिवसांमध्ये भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात गायक अभिजित कोसंबी तसेच शशिकांत कोठावळे प्रस्तुत ‘लावणी महानायिका’ या कार्यक्रमांना सर्वाधिक पसंती मिळाली. विनोदवीर योगेश सुपेकर यांनी राजकीय नेते व अभिनेत्यांच्या नकला केल्या, त्यास पसंतीची पावती मिळाली. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते विजय उलपे, मधुसूदन ओझा, शीतल चोपडे, वैष्णवी गायकवाड, शुभांगी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. दररोज प्रत्येकी ५० हजार नागरिक या जत्रेत सहभागी होत होते, त्यानुसार तीन लाखापेक्षा अधिक नागरिकांनी, विशेषत: महिलांनी पवनाथडीत सहभाग घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पवनाथडीत दीड कोटी रूपयांची उलाढाल झाल्याचा अंदाजही पालिकेने वर्तवला आहे. पवनाथडीतील खाण्याच्या तसेच वस्तू खरेदीच्या दालनांना नागरिकांनी सर्वाधिक भेटी दिल्याचे दिसून आले.