पिंपरी महापालिकेच्या ठेवी सुरक्षित असून त्या मोडण्याची वेळ येणार नाही. तूर्त कर्ज काढण्याचाही विचार नाही, असे आयुक्त राजीव जाधव यांनी अंदाजपत्रकाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. अंदाजपत्रकात करवाढ नसली तरी भविष्यात मात्र करवाढ करावी लागेल, असेही सूतोवाच आयुक्तांनी केले आहे.
कोणतीही करवाढ नसलेले, २७७ कोटी शिलकीचे आणि नव्या प्रकल्पांची घोषणा न करता सुरू असलेली विकासकामेच पूर्ण करण्यावर भर देणारे पिंपरी पालिकेचे अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले. सन २०१६-१७ चे हे अंदाजपत्रक दोन हजार ७०७ कोटींचे असून गेल्या दोन वर्षांत ६०० कोटींची बचत केल्याचा दावा आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर करताना केला आहे. तसेच दरवर्षी भरीव उत्पन्नवाढीचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले आहे. तीन वर्षांत संपूर्ण शहर एलईडी दिव्यांचे करण्याचा निर्धार करत २४ तास पाणीपुरवठय़ाच्या नियोजनाचा पुनरूच्चारही आयुक्तांनी केला असून सर्व उड्डाणपुलांची कामे मार्गी लावण्याचे उद्दिष्ट ठेवून भव्य रस्ते, बीआरटी मार्गाचा विस्तार, वातानुकूलित बससेवा देत यापूर्वी गुंडाळून ठेवलेल्या ‘ट्राम’चीही योजना आयुक्तांनी अंदाजपत्रकातून नव्याने मांडली आहे.
निवडणुका आहेत असा विचार करून अंदाजपत्रक मांडलेले नाही. करवाढ करावी लागेल, सभेने त्याविषयी निर्णय घ्यावा. ‘मेट्रो’चा प्रकल्प आता खूपच पुढे गेला आहे. ट्रामच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. त्यासाठी काही प्रमाणात तरतूदही करण्यात आली आहे. भव्य रस्ते, ग्रेडसेपरेटर, बीआरटी या सुविधा असलेले शहर म्हणून जसे हे शहर ओळखले जाईल, त्याच पद्धतीने ट्राम सुरू झाल्यास त्यामुळेही शहराची ओळख निर्माण होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे. शहरातील ८० टक्के विकासकामे  मार्गी लावण्यात आली असून मार्चअखेपर्यंत २२०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
दोन वर्षांत पारदर्शक कारभार केला. मोठय़ा प्रमाणात बचतही केली. महापालिकेच्या सुरक्षित ठेवी मोडण्याची वेळ येणार नाही. कर्जाची तूर्त गरज नाही आणि तसा विचारही नाही. मात्र, मोठय़ा प्रकल्पांसाठी आवश्यकता वाटल्यास कर्ज घेण्याचा विचार करू. ‘स्वच्छ भारत’ योजनेअंतर्गत देशात नववे आणि राज्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याने सर्वाचा उत्साह दुणावला असून दोन वर्षांत घेतलेल्या परिश्रमाचे हे फलित आहे. मागील दोन वर्षांत विविध माध्यमातून स्वच्छतेचे उपक्रम राबवले. मोकळे भूखंड स्वच्छ करण्यात आले. धर्माधिकारी ट्रस्टच्या सहकार्याने शहरात अनेक ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या. यामध्ये सर्वाचे योगदान आहे, असेही आयुक्तांनी आवर्जून नमूद केले.