पिंपरी पालिकेच्या कामकाजावर परिणाम

पिंपरी पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर प्रशिक्षणासाठी स्वीडन दौऱ्यावर गेले. त्यानंतर, लगेचच अनेक अधिकारी सुटीवर रवाना झाले आहेत. सगळेच ‘निवांत’ असल्याने पालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला असून नागरिकांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे.

आयुक्त हर्डीकर सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत ‘पीएमआरडीए’चे आयुक्त किरण गित्ते यांच्याकडे आयुक्तपदाचा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. तथापि, ते पालिकेत फिरकले नाहीत. सहआयुक्त दिलीप गावडे जायबंदी असल्याने प्रदीर्घ रजेवर आहेत. अतिरिक्त आयुक्तपद रिक्त आहे. सहायक आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्याकडे प्रभारी कार्यभार आहे. गुरुवारी आमदारांची अंदाजपत्रकीय समितीची बैठक आष्टीकरांनाच हाताळावी लागली. बरेच दिवस आयुक्त नसणार, हे माहिती असल्याने अनेक अधिकाऱ्यांनी दीर्घ सुटय़ा घेतल्या आहेत. यामध्ये काही बडय़ा तसेच काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. इतर बहुतांश अधिकारी कामावर असून नसल्यासारखे आहेत. सही करून बाहेर पडण्याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. तर, ‘साइट व्हिजिट’ च्या नावाखाली अधिकारी हवे तिथे जाणे पसंत करत असल्याचे दिसून येते. असे वातावरण मिळाल्यानंतर अनेक कर्मचारीही मोकाट सुटले आहेत. सकाळी हजेरी लावून बाहेर भटकंती करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. आयुक्तांनी दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांच्या गैरहजेरीतील कामकाजाची माहिती घेतल्यास बऱ्याच गोष्टींवर प्रकाश पडू शकेल.