महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या बाणेर-बालेवाडी या गावांचा विकास आराखडा राज्य शासनाने सोमवारी अंतिमत: मंजूर केला. या गटातील ४६ लोकोपयोगी आरक्षणे उठवून त्या जागा निवासी करण्यात आल्या होत्या. आरक्षणे उठवण्याच्या या प्रकाराविरुद्ध पुण्यात मोठा संघर्षही झाला होता.
महापालिकेत समाविष्ट झालेल्या तेवीस गावांचा आराखडा गेली अनेक वर्षे गाजत आहे. महापालिकेने सन २००५ मध्ये तेवीस गावांचा आराखडा राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला होता. बाणेर-बालेवाडी या गट क्रमांक १ चा आराखडा १३ ऑगस्ट २००८ रोजी राज्य शासनाने मंजूर केला. तशी अधिसूचना १ ऑक्टोबर रोजी प्रसिद्धही झाली. मात्र, त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी १ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेली अधिसूचना शासनाने रद्द केली. बाणेर-बालेवाडी या गटात रस्ते, नाला गार्डन, शाळा, क्रीडांगण, उद्याने यासह ९५ आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यांचे क्षेत्र सहा लाख ३१ हजार ५३८ चौरसमीटर इतके होते. मात्र, त्यातील ४६ आरक्षणे उठवण्यात आली.
बाणेर-बालेवाडी भागातील आरक्षणे मोठय़ा प्रमाणावर उठवून या जागा हेतूत: निवासी केल्याचा आरोप त्या वेळी झाला होता. सी-डॅकने दर्शवलेल्या टेकडय़ांच्या जागा या आराखडय़ातून वगळण्यात आल्या. तसेच काही भागात नव्याने टेकडय़ा दर्शवण्यात आल्या. या सर्व प्रकारांच्या विरोधात पुण्यातील विविध राजकीय पक्ष तसेच स्वयंसेवी संस्थांनी मोठा संघर्षही केला होता. पुढे राज्य शासनाने पुन्हा हरकती-सूचना मागवल्या. त्यांची सुनावणी पुण्यात घेण्यात आली. ती प्रक्रिया पार पडल्यानंतर सन २०१० साली नगररचना संचालकांकडून हा आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. त्याला सोमवारी अंतिमत: मंजुरी देण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले.
सर्वाना बरोबर घ्या- मोकाटे
विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना पुण्यातील सर्व आमदारांनी जुन्या हद्दीच्या आराखडय़ाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी तेवीस गावांचा आराखडा आणि नव्याने समाविष्ट करण्याची गावे याबाबतही चर्चा झाली होती, अशी माहिती आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी दिली. आराखडय़ाचा तसेच गावांचा निर्णय घेण्यासाठी १५ ऑगस्टनंतर बैठक घेतली जाईल, असे आश्वासन त्या चर्चेत देण्यात आले होते. प्रत्यक्षात सर्व पक्षांना विश्वासात न घेता, बैठक न घेता निर्णय झाला आहे. हे शहराच्या दृष्टीने निश्चितच हितावह नाही. दूरगामी परिणाम करणारे जनहिताचे निर्णय सर्वाना बरोबर घेऊनच झाले पाहिजेत, असेही मोकाटे म्हणाले.