बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com

पिंपरी भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू असतानाच विद्यमान महापौर, उपमहापौरांना मुदतवाढ देण्याऐवजी तीन महिन्यांकरिता नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी. तसेच, अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी सध्याचे स्वीकृत नगरसेवक आणि प्रभाग स्वीकृत सदस्यांचे राजीनामे घ्यावेत आणि प्रतीक्षा यादीतील कार्यकर्त्यांना पदे द्यावीत, असा सूर पक्षामध्ये आळवला जात आहे.

पिंपरी शहर भाजपमध्ये सध्या बदलाचे वारे वाहू लागले आहेत. पक्षाचे शहराध्यक्ष, महापौर, उपमहापौर, पक्षनेते, स्वीकृत सदस्य, प्रभाग स्वीकृत सदस्य यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार पक्षवर्तुळात सुरू आहे. त्यावरून पक्षातील वातावरण ढवळून निघाले आहे. इच्छुकांनी मोर्चेबांधणी करत आपल्या नावावर शिक्कामोर्तब व्हावे, यासाठी नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्याकडील शहराध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्या कुणाकडे तरी सोपवावी, अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे केली, तेव्हापासून शहराध्यक्षपदासाठी पक्षात तीव्र रस्सीखेच सुरू झाली आहे. अनेक नावे चर्चेत आहेत. पुण्यात आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे शहराध्यक्षपद देण्यात आल्याने तसाच निकष लावून पिंपरीतही मोठय़ा पदावर असणाऱ्या अनुभवी कार्यकर्त्यांकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात येईल, असा तर्क लावण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संमतीने नव्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर, विद्यमान महापौर आणि उपमहापौरांना तीन महिने मुदतवाढ मिळणार आहे. मात्र, विद्यमानांना मुदतवाढ देण्याऐवजी तीन महिन्यांसाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जावी, असा विचार पक्षात पुढे आला आहे. तीन महिन्यांच्या महापौरपदावरून काही नगरसेवकांकडे याविषयी विचारणाही झाली आहे. पक्षनेते एकनाथ पवार यांच्या कार्यपद्धतीविषयी बऱ्याच तक्रारी असल्याने या पदावर नव्या नेत्याची निवड करण्याची मागणी पक्षात सुरू आहे. त्याशिवाय माउली थोरात, मोरेश्वर शेडगे, बाबू नायर हे पक्षाचे तीन स्वीकृत नगरसेवक आहेत. प्रभाग स्तरावर २४ कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्यत्व देण्यात आले आहे. या स्वीकृतांचा निम्मा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे राजीनामे घेऊन इतर कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या सर्व गोष्टींवर पक्षात गांभीर्याने विचार सुरू आहे. भाजपमध्ये गर्दी वाढलेली आहे. सर्वाना संधी देता येणे शक्य नाही. बाहेरून आलेले आणि पक्षाचे निष्ठावंत असा संघर्ष सुरू आहे. दोन्हीत समन्वय साधला, तरच पक्षाचा गाडा सुरळीतपणे चालणार आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे असो की नव्याने नियुक्ती, असा कोणताही निर्णय घेताना स्थानिक नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

महापौरांचे दौरे आणि बैठका

महापौरांना मुदतवाढ देण्याचा निर्णय झाल्याने पिंपरीचे महापौर राहुल जाधव यांच्या दृष्टीने हे वाढीव तीन महिने पर्वणीचे ठरणार आहेत. महापौर होण्यासाठी कितीही देव पाण्यात ठेवले, तरी संधी मिळत नाही, अशी परिस्थिती पिंपरी-चिंचवडमध्ये असताना, मनसेतून भाजपमध्ये आलेल्या जाधव यांना आमदार महेश लांडगे यांच्या कृपादृष्टीमुळे खूपच लवकर महापौरपदाची संधी मिळाली. या संधीचे करायचं तितकं सोनं महापौरांनी केले आहे. हे त्यांच्या एकूणातील कर्तबगारीवरून दिसून येते. रिक्षाचालक ते महापौर असा प्रवास पूर्ण करणारे जाधव पहिल्या दिवसापासूनच चर्चेत राहिले आहेत. महापौर झाल्याचा आनंद त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोतीच्या पोती भरून भंडारा उधळून साजरा केला. परिणामी, पहिल्याच दिवशी ते टीकेचे धनी बनले. तेव्हापासून ते पवना धरणापाशी केलेल्या गोळीबारापर्यंत विविध घटनांमधून ते प्रसिद्धीत राहिले आहेत. महापौरांनी शाळांची पाहणी, स्मशानभूमींची पाहणी, मैदानांची पाहणी, नाल्यांची पाहणी असे भरपूर पाहणी दौरे केले. वेळोवेळी बैठकांचा सपाटा लावला. निमित्त मिळताच त्यांनी परदेश वाऱ्या केल्या. या सर्व गोष्टीतून काय निष्पन्न झाले, त्यांनाच माहिती असावे. सर्वप्रकारच्या खेळ्या करत महापालिकेचे सभागृह ते रेटून चालवतात. भोसरी मतदार संघाचे विषय असल्यास महापौरांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. अधिकाऱ्यांना ते चांगलेच दमात घेतात. अनेक अधिकाऱ्यांना तसेच ठेकेदारांना महापौरांची कार्यपद्धती पसंत नाही. मात्र, सर्वपक्षीय नगरसेवकांशी त्यांचे मधुर संबंध आहेत. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सतत माणसांमध्ये असणाऱ्या महापौरांच्या कार्यालयात नागरिकांचा चांगला राबता असतो. विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांची रीघ लागलेली असते. भविष्यात कधीतरी आमदार होण्याचे महापौरांचे स्वप्न आहे. सध्या याविषयी ते काहीच बोलत नाही. कारण, सध्या आमदारकीची इच्छासुद्धा त्यांना मारक ठरू शकते. राजकीय कुलदैवताची नाराजी महापौरांना ओढावून घ्यायची नाही. तूर्तास तरी ते महापौरपदावर खूश आहेत. आणखी तीन महिने बोनस मिळाल्यास निवडणुकीच्या धामधुमीत नव्या दमाने राजकीय दौरे करायला महापौर तयारीत आहेतच.