गॅस कटरच्या सहाय्याने अ‍ॅक्सिस  बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल ११ लाख रुपये लंपास केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. घटनास्थळी चिखली पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे शुक्रवारीच बँकेडून एटीएममध्ये लाखो रुपायांची रोकड भरण्यात आली होती, त्यानंतर शनिवारी चोरट्यांनी हे एटीएम फोडले असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील नेवाळे वस्ती येथील अ‍ॅक्सिस  बँकेचे एटीएम चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील ११ लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही घटना सोमवारी दुपारी बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली.

दरम्यान, बँकेने शुक्रवारी याच एटीएममध्ये काही लाख रुपयांची रोकड भरली होती. तेव्हाच, चोरट्यांनी पाळत ठेवून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एटीएम फोडून त्यातील रोकड लंपास केली असावी, असा चिखली पोलिसांचा संशय आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.