महापालिका निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या भाजप-शिवसेनेत खडाजंगी सुरू असताना, आता काँग्रेसही त्यात आक्रमकपणे उतरली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजप-शिवसेना सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राचे वाटोळे झाले आहे, अशी तोफ त्यांनी डागली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी काँग्रेसने आज जाहीरनामा प्रकाशित केला. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्राचे पूर्ण वाटोळे झाले आहे. ‘कुठे नेऊन ठेवलाय, त्यापेक्षा ‘महाराष्ट्र कुठे आहे’, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. सर्वच क्षेत्रांतील उत्पन्न कमी झाले आहे. राज्यात विकासकामे झाल्याचे कुठेही दृष्टीस पडत नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. केवळ घोषणाबाजी, जाहिरातबाजी आणि ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ यापलिकडे काही केले जात नाही. घोषणाबाजी करायची, जाहिराती द्यायच्या आणि निवडणुकीच्या काळात सत्तेचा दुरुपयोग करायचा. सध्या एवढेच काम सुरू आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.

शिवसेनेवरही त्यांनी टीकास्त्र सोडले. सध्या राज्यातील चित्र पाहिले तर, कोणी अर्धवटराव म्हणत आहे, तर कोणी मूर्ख म्हणून संबोधित आहेत. एकमेकांना दिल्या जाणाऱ्या उपमा संपत आल्या आहेत, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. शिवसेनेचे पाच ते सहा मंत्री काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. पण हा सर्व देखावा आहे. ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’, असे चित्र निर्माण केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी शहराध्यक्ष सचिन साठे, पृथ्वीराज साठे, कवीचंद भाट, विष्णू नवाळे आदी नेते उपस्थित होते.