पिंपरी-चिंचवडमध्ये मेहुण्यानेच आपल्या बहिणीच्या पतीची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची घटना घडली आहे. मोहन लेवडे असं मृत व्यक्तीचं नाव असून आरोपी विष्णु जगाडेला पोलिसांनी अटक केली आहे. दुसऱ्या महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधांमुळे मोहन विष्णुच्या बहिणीला सतत त्रास देत होता, याचा राग मनात ठेवत विष्णुने हे कृत्य केल्याचं समजतंय. महत्वाची गोष्ट म्हणजे ही घटना घडल्यानंतर आरोपीने स्वतः १०० नंबरवर फोन करत हत्येची कबुली दिली.
मोहन लेवडे यांचं त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेशी प्रेमसंबंध होते. यावरुन मोहन यांनी आपल्या पत्नीला मुलांना घेऊन तू माहेरी जा…यासाठी त्रास द्यायला सुरुवात केली. याचसोबत घटस्फोट घे यासाठीही मोहन विष्णुच्या बहिणीवर दबाव आणत होता. बहिणीने ही बाब आपला भाऊ विष्णुला सांगितली. बहिणीचा त्रास कमी होण्यासाठी विष्णू मोहन यांच्याशी चर्चा करण्यासाठी बहिणीच्या घरी गेला. विष्णु आणि मोहन यांच्यात रात्री उशीरापर्यंत दारुची पार्टीही झाली. यावेळी विष्णुने आपल्या दाजींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र मोहन लेवडे यांनी विष्णुची एकही गोष्ट एकून घेतली नाही. या चर्चेचं रुपांतर भांडणात झाल्यामुळे संतापलेल्या विष्णुने मोहन यांच्यावर शस्त्राने वार केले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
या गोंधळात विष्णुची बहिणी घटनास्थळी येताच तिलाही धक्का बसला. विष्णुने आपली बाजू समाजवून सांगत, १०० क्रमांकावर फोन करुन पोलिसांना हत्येची कबुली दिली. यानंतर भोसरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरोपी विष्णुला अटक केली आहे. या घटनेची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 10, 2020 10:40 am