पक्षश्रेष्ठींना सक्षम चेहरा मिळेना

पिंपरी : पिंपरी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा तिढा अद्याप कायम आहे. सचिन साठे यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या दीड महिन्यात नव्या शहराध्यक्षांची निवड होऊ शकलेली नाही. जवळपास १५ जणांनी मुलाखती दिल्या. मात्र, सक्षम चेहरा मिळत नसल्याने पक्षश्रेष्ठींचा शोध सुरूच आहे.

पक्षांतर्गत नाराजीतून सचिन साठे यांनी ११ नोव्हेंबरला राजीनामा दिला. सुरुवातीला त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला नाही. साठे ठाम राहिल्याने तो मंजूर करून नव्या शहराध्यक्षपदाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार शरद आहेर व राजेश शर्मा हे निरीक्षक २४ नोव्हेंबरला शहरात येऊन गेले. त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सर्वाचे म्हणणे ऐकून घेतले. स्थानिक गटबाजीचा पुरेपूर प्रत्यय निरीक्षकांना तेव्हा आला होता. इच्छुकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. या दौऱ्याचा सविस्तर अहवाल त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द केला. त्यानंतर, नव्या नावाची घोषणा अपेक्षित होती. मात्र, गेल्या दीड महिन्यात अंतिम निर्णय झाला नाही. इच्छुकांमध्ये घालमेल असून मोर्चेबांधणी सुरू आहे.

पिंपरी पालिकेच्या निवडणुका वर्षभरात होणार आहेत. त्यादृष्टीने सक्षम नेतृत्वाचा काँग्रेसकडे अभाव आहे. त्यामुळेच कोणत्याही नावावर पक्षश्रेष्ठींचे एकमत होताना दिसत नाही.  नव्यानेच नियुक्त झालेले काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे यांनी १५ दिवसात चित्र स्पष्ट होईल, असे नुकतेच पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

आगामी पालिका निवडणुका, पोटनिवडणुका आणि संघटनात्मक कामाची गरज पाहता शहराध्यक्षपदाचा निर्णय लवकर  होणे आवश्यक आहे. इच्छुकांसह सगळेच कार्यकर्ते निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.

– मनोज कांबळे, माजी प्रदेशाध्यक्ष, एन.एस.यू.आय.