राजकीय पक्षांच्या स्वागत कक्षांना पिंपरी महापालिकेने परवानगी नाकारली

विसर्जन मार्गावर स्वागत कक्ष थाटून मंडळांचे आणि गणेशभक्तांचे स्वागत करण्याच्या नावाखाली मोठमोठे होर्डिग लावून स्वत:चीच प्रसिद्धी करण्याच्या राजकीय नेत्यांना तसेच आगामी निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांच्या मनसुब्यांवर पिंपरी महापालिकेने पाणी फेरले आहे. विसर्जनाच्या दिवशी मार्गावर उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षांना याही वर्षी परवानगी न देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

शहरातील विसर्जन मार्गावर स्वागत कक्ष उभारण्याची शहरात अघोषित परंपरा होती. मिरवणुकीच्या मार्गावर विविध संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांकडून स्वागत कक्ष उभारण्यात येतात. या स्वागत कक्षांमध्ये मिरवणूक मार्गाने येणाऱ्या मंडळांचे तसेच गणेशभक्तांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या तोंडावर यंदा गणेश विसर्जनाच्या दिवशी भव्य व्यासपीठ व स्वागत कक्ष उभारून मतदार भाविकांचे लक्ष आपल्याकडे खेचण्याचा राजकीय पक्ष तसेच निवडणूक इच्च्छूक उमेदवारांचा प्रयत्न होता. मात्र, पालिकेने वाहतुकीला अडथळे आणि सुरक्षिततेचे कारण देत अशा स्वागत कक्षांना परवानगी देण्यास नकार दर्शवला आहे. पोलिसांचीही भूमिका परवानगी न देण्याचीच होती. त्यामुळे पोलिसांचे पाठबळ महापालिकेला मिळाले.

जेमतेम सहा महिन्यांवर महापालिका निवडणुका असल्याने यंदा एकूणच विसर्जन मार्गावर फलकबाजीला ऊत येणार आहे. तसेच स्वागत कक्षही मोठय़ा संख्येने उभारले जाणार होते. चिंचवड, पिंपरी, भोसरी या प्रमुख मार्गासह अंतर्गत भागातील विसर्जन मार्गावरही हे चित्र दिसणार आहे. अशा मार्गावर मोक्याच्या ठिकाणी स्वागत कक्ष उभारण्याचा राजकीय पक्षांचा आग्रह असतो. विशेषत: चिंचवड आणि पिंपरीमध्ये निघणाऱ्या मार्गासाठी स्वागत कक्ष उभारण्याचा राजकीय पक्षांचा विशेष आग्रह असतो. तथापि, पोलिसांचा व महापालिकेचा स्वागत कक्ष वगळता अन्य स्वागत कक्षांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने यंदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना चमकण्याची संधी यंदा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातही गेल्या काही वर्षांपासून अशा स्वागत कक्षांवर बंदी आहे.