घाऊक बाजारात प्रतवारीनुसार प्रतिडझन ७० ते २७० रुपये दराने विक्री

केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अननसाची आवक गेल्या आठवडय़ात पूर्णपणे थांबली होती. त्यानंतर केरळहून अननसाची आवक पुन्हा सुरू झाली आहे.

गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात केरळमधून दररोज चार ते पाच ट्रक अननसाची आवक होते, मात्र केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अननसाची आवक थांबली होती. केरळमध्ये अननसाची लागवड मोठय़ा प्रमाणावर होते. तेथून संपूर्ण देशभरात अननस विक्रीसाठी पाठवले जातात. अतिवृष्टीमुळे अननसाची आवक थांबली होती. केरळमधील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्यानंतर अननसाची थांबलेली आवक पुन्हा सुरू झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक होत असल्याने अननसाचे दर स्थिर आहेत. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार प्रतिडझन अननसांची ७० ते २७० रुपये या दराने विक्री केली जात आहे. केरळमधून ट्रकने अननस विक्रीसाठी पाठविले जातात. तेथून पुण्यात माल येण्यास तीन दिवसांचा कालावधी लागतो. केरळमधील पूरस्थिती नियंत्रणात येत असल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे. सध्या बाजारात दाखल होत असलेले अननस भिजलेले आहेत. त्यामुळे प्रतवारीवर परिणाम झाला आहे, अशी माहिती फळबाजारातील अननसाचे व्यापारी राजीव कु ऱ्हाडे यांनी दिली.

सध्या बाजारात केरळमधील व्यापारी साठवलेले अननस विक्रीसाठी पाठवत आहेत. अननस भिजल्याने प्रतवारी चांगली नाही. केरळमधील अतिवृष्टीमुळे येत्या काळात अननसाच्या लागवडीवर परिणाम होऊ शकतो, असे व्यापारी अनिश कुमार यांनी सांगितले.

अननसांच्या बागांमध्ये पाणी

यंदाच्या वर्षी अननसाच्या लागवडीसाठी पोषक वातावरण तयार झाले होते. त्यामुळे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होण्याची शक्यता होती. मात्र, गेल्या आठवडय़ात केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे निम्म्याहून अधिक पिकाचे नुकसान झाले आहे. बागांमध्ये पाणी शिरल्याने अननसाचे पीक हाती येण्यापूर्वीच वाया गेले. यंदा अननसाची लागवड करणाऱ्या शेतक ऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची आशा होती, अशी व्यथा बाजारात अननस विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतक ऱ्यांनी मांडली.