स्वयम् संकेतस्थळावरील विविध ऑनलाइन अभ्यासक्रमांची कक्षा रुंदावण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) तज्ज्ञांची समिती नियुक्त केली आहे. स्वयम्चे पदवी अभ्यासक्रम तयार करणे, उदयोन्मुख क्षेत्रातील अभ्यासक्रम विकसित करण्यासह स्वयम् अभ्यासक्रमांचे श्रेयांक विद्यापीठांनी स्वीकारणे बंधनकारक करणे, सध्या असलेली २० श्रेयांक गुणांची मर्यादा वाढवण्यासाठीच्या नियमांत बदल करणे अशा विविध मुद्दय़ांवरील आपल्या शिफारसी या समितीकडून सादर केल्या जातील.

करोना विषाणू संसर्गामुळे लागू कराव्या लागलेल्या संचारबंदीमुळे शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक बदल होऊ घातले आहेत. ऑनलाइन अभ्यासक्रम शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे ठरत आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विकसित केलेल्या स्वयम् या संके तस्थळावरील अभ्यासक्रम कोणालाही करता येतात. विशेषत: विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीचे स्वयम्मधील अभ्यासक्रम पूर्ण के ल्यास त्यांना श्रेयांक गुण प्रदान केले जातात. या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता स्वयम् अभ्यासक्रमांच्या अद्ययावतीकरणासह काही महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत.

स्वयम् संके तस्थळावरील अभ्यासक्रमांची गुणवत्ता वृद्धी करण्यासह काही नवे अभ्यासक्रम विकसित करण्याची आवश्यकता आहे.  स्वयम्च्या माध्यमातून परीक्षा घेऊन त्याचे श्रेयांक गुण विद्यापीठांनी मान्य करणे याबाबतचा अभ्यास समिती करणार आहे.

– डॉ. नितीन करमळकर, समिती सदस्य