महापालिका अंदाजपत्रकात नगरसेवकांनी सुचविलेल्या विकासकामांना आर्थिक तरतुदी करण्यात पक्षपात झाल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद खास सभेत मंगळवारी उमटले. विशेषत: नगरसेवकांपेक्षा नगरसेविकांना अत्यंत तुटपुंजी तरतूद करण्यात आल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेविकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करत विद्यमान अध्यक्ष अश्विनी कदम यांना आवाहन केले, की पुढच्या वर्षी नगरसेविकांना जास्तीतजास्त तरतूद करून हम किसी से कम नहीं हे दाखवून द्या..
महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूराव कर्णे गुरुजी यांनी त्यांचे अंदाजपत्रक मुख्य सभेला सादर केले असून, त्यावरील चर्चेत खास सभेत अंदाजपत्रक तयार करताना पक्षपात झाल्याची तक्रार करण्यात आली. राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये विकासकामांसाठी कोटय़वधी रुपयांच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. मात्र इतर पक्षांतील नगरसेवकांना करण्यात आलेल्या तरतुदी मामुली स्वरूपाच्या आहेत. तरतुदींमध्ये झालेल्या या पक्षपाताबाबत वादंग सुरू असतानाच खास सभेत मंगळवारी सर्वपक्षीय नगरसेविकांनी आवाज उठवला. त्यांना मिळालेल्या तरतुदी अतिशय कमी असून अंदाजपत्रकात ज्या विकासकामांसाठी आर्थिक तरतूद मागितली होती त्याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार नगरसेविकांनी एकमुखाने केली.
अंदाजपत्रक समतोल असेल तर शहराचा विकासही समतोल पद्धतीने होईल ही वस्तुस्थिती असताना जो नगरसेवक अध्यक्षांच्या जवळचा त्याला अधिक तरतूद आणि जो जरा वाकडा बोलतो त्याचे अंदाजपत्रक एकदमच वाकडे, असा प्रकार झाल्याचा आरोप सभेत पुष्पा कनोजिया यांनी केला. महिला आरक्षणामुळे प्रत्येक प्रभागातून एक नगरसेविका निवडून आलेली असतानाही नगरसेवकांना अधिक तरतूद आणि नगरसेविकांना कमी असाही प्रकार झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. जे सदस्य स्थायी समितीमध्ये आहेत त्यांना जास्त तरतूद झाली आहे. हा फुगवटा ते स्थायी समितीमध्ये आहेत म्हणून आला का, अशीही विचारणा सभेत करण्यात आली. सोनम झेंडे यांनीही ठराविक भागांसाठीच अंदाजपत्रकात तरतुदी करण्यात आल्या आहेत. सर्वाना समान तरतूद का नाही, असा प्रश्न उपस्थित केला. काही ठराविक प्रभागांना कोटय़वधी रुपये द्यायचे आणि आमच्या भागाला फार कमी तरतूद करायची हा प्रकार अनेक वर्षे चालू आहे, अशी तक्रार संगीता ठोसर यांनी केली.
स्थायी समितीच्या अध्यक्ष म्हणून अश्विनी कदम या नुकत्याच निवडून आल्या आहेत. त्यामुळे नगरसेविकांनी पुढच्या वर्षी आमच्यासाठी चांगले अंदाजपत्रक करा अशी अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त केली.