महापालिकेचा मिळकत कर ३१ मे पर्यंत भरल्यास सवलत देऊ केल्यामुळे या योजनेचा फायदा शहरातील चार लाख ४१ हजार मिळकतधारकांनी घेतला असून या योजनेमुळे ४४० कोटी रुपये एवढा मिळकत कर गोळा झाला आहे.
महापालिकेचे कर संकलन प्रमुख, उपायुक्त हेमंत निकम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मिळकत कराची रक्कम ३१ पूर्वी भरल्यास मिळकतधारकांना सर्वसाधारण करामध्ये पाच ते दहा टक्के एवढी सवलत दिली जाते. या योजनेला यंदाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महापालिकेने कर भरण्याची जी ऑललाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे, त्या सुविधेअंतर्गत ८१ हजार मिळकतधारकांनी कर भरला. या सुविधेतून ६० कोटींचा भरणा झाल्याचेही निकम यांनी सांगितले. पुण्यात सदनिका असलेल्या परंतु सध्या परदेशात असलेल्या नागरिकांनीही या सुविधेचा लाभ घेतला असून महापालिकेचा मिळकत कर ५० देशांमधून भरण्यात आला आहे.
कर भरताना अनेक मिळकतधारकांनी धनादेशाद्वारे भरणा केला असून धनादेश न वटल्यास कारवाई करण्यात येणार आहे. उर्वरित दहा महिन्यांत नव्या मिळकतींचा शोध तसेच ज्या मिळकतींना कर आकारणी अद्यापही झालेली नाही अशा मिळकतींना कराची आकारणी करणे तसेच थकबाकी वसुलीसाठीचे प्रयत्न या पद्धतीने काम केले जाईल, असेही निकम यांनी सांगितले. ज्या मिळकतधारकांच्या करासंबंधी तक्रारी आहेत त्यांच्या तक्रारींचे निराकरण एक महिन्यात करावे, अशाही सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे ते म्हणाले.
मिळकत कराचा भरणा नागरिकांना करता यावा यासाठी महापालिकेने शहरात ६५ नागरी सुविधा केंद्र उभारली असून त्यातील २६  केंद्रांमधूनच कराचा भरणा झाला आहे. त्यामुळे उर्वरित ३९ सुविधा केंद्र बंद असल्याचेही स्पष्ट झाले आहे.