स्मार्ट सिटी अभियानात भाग घेण्यासाठी महापालिका प्रशासनाला परवानगी देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या मुख्य सभेत शुक्रवारी तब्बल तीन तासांच्या चर्चेनंतर एकमताने मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाला मान्यता देताना सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आमच्या सरकारची नेहरू योजनाच चांगली होती, नवी योजना म्हणजे भूलभुलय्या आहे, अशी टीका केल्यामुळे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी नेहरू योजनेत आलेले मोठे अपयश उघडे करत सत्ताधाऱ्यांची कोंडी केली.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी अभियानासाठी महापालिकेने प्रवेशिका पाठवली असून या प्रस्तावाला मुख्य सभेने मंजुरी दिली, तर महापालिकेला पाच गुण मिळणार आहेत. प्रवेशिका पाठवण्याच्या या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेपुढे शुक्रवारी आल्यानंतर या अभियानाची सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी सत्ताधारी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी केली. या अभियानात प्रत्येक शहराला विकासाच्या योजना निवडण्याचा अधिकार आहे, असे आयुक्त कुणाल कुमार यांनी या वेळी सांगितले.
‘नेहरू योजना चांगली होती’
आयुक्तांच्या निवेदनानंतर राष्ट्रवादीचे दिलीप बराटे, बाबुराव चांदेरे, विशाल तांबे, अप्पा रेणुसे, सुभाष जगताप, सभागृहनेता शंकर केमसे, काँग्रेसच्या कमल व्यवहारे तसेच आरपीआयचे गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी अभियानाला विरोध नसल्याचे सांगितले. मात्र सर्वानीच या योजनेवर टीका केली. ही योजना म्हणजे भूलभुलय्या आहे. पूर्वीच्या सरकारची नेहरू योजना बंद करून ही योजना आणण्यात आली आहे. स्मार्ट सिटी योजना म्हणजे फक्त ब्रँडिंग आहे. नेहरू योजनेत केंद्रातील सरकारकडून अडीच ते तीन हजार कोटी रुपये महापालिकेला मिळाले होते. स्मार्ट सिटी अभियानात मिळणारा निधी मात्र फारच कमी आहे, असे विविध आक्षेप या वेळी सत्ताधारी सदस्यांकडून घेण्यात आले.
‘स्मार्ट सिटी ही सुरुवात’
सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या आक्षेपांना शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ आणि भाजपचे गटनेता गणेश बीडकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आणि आक्षेपांना उत्तरे दिली. नेहरू योजनेत तीन हजार कोटी रुपये केंद्राने दिलेले नाहीत, तर दहा वर्षांत नऊशे सदुसष्ट कोटी रुपये केंद्राने दिले. स्मार्ट सिटी ही सुरुवात आहे. केंद्राच्या अनेक योजनांच्या माध्यमातून मोठा निधी पुण्याला मिळणार आहे, असे बीडकर यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या आकडेवारीला राष्ट्रवादीने हरकत घेतल्यामुळे आयुक्तांकडून खुलासा मागण्यात आला. आयुक्तांनीही नेहरू योजनेत केंद्राने नऊशे सदुसष्ट कोटी रुपये दिल्याचे सांगितले. बीआरटी, सायकल ट्रॅक, पथारीवाल्यांसाठी ओटे अशा नेहरू योजनेतील अनेक प्रकल्पांवर कोटय़वधी रुपये खर्च झाले आणि ते सर्व प्रकल्प फसले, काही निधी परत गेला. ते सर्व अपयश झाकायचे आणि केंद्राने योजना आणली म्हणून टीका करायची असा प्रकार सुरू असल्याचेही बीडकर आणि हरणावळ यांनी या वेळी सांगितले.
सभेत मनसेचे वसंत मोरे म्हणाले, की स्मार्ट सिटी अभियानामुळे पुण्याचे नाव देशात होईल. ही स्पर्धा असल्यामुळे स्पर्धेबाबत एवढय़ा चर्चेची आणि विषयाला फाटे फोडण्याची, टीकेची गरजच नाही. नेहरू योजनेतील अनेक कामांचे, प्रकल्पांचे काय झाले ते आपण पाहिले आहे. भाजपचे अशोक येनपुरे, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांनीही योजनेचे समर्थन केले. एकूण चर्चेवर टीका करताना मनसेचे गटनेता राजेंद्र वागसकर यांनी स्मार्ट सिटी या विषयाचेही राजकारण झाल्यासारखे वाटत आहे, असे सांगितले.