शहरातील रस्ते लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे आदेश महापौर आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांनी दिल्यानंतर कामे पूर्ण करण्याबाबत नियोजन केले जात असले, तरी शहरातील बहुतेक सर्व ठिकाणी रस्ते पूर्ववत करण्याचे काम अतिशय ढिसाळ पद्धतीने केले जात असल्याचे चित्र दिसत आहे. महापालिकेने रस्ते पूर्ववत करण्याचे काम ठेकेदारांना दिले असले, तरी त्यांची कामे सध्या सर्वत्र अर्धवट अवस्थेतच आहेत.
एप्रिल महिना संपत आल्यामुळे28ds06-Bajirao-Raod सध्या जी विकासकामे सुरू आहेत ती पूर्ण करण्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. गेले काही महिने शहरभर विविध कारणांनी खोदाई केली जात होती. त्यात मुख्यत: खासगी केबल कंपन्यांकडून केबल टाकण्याची कामे करण्यात येत होती. तसेच महापालिकेचा पथ विभाग, ड्रेनेज विभाग वगैरे विविध विभागांतर्फेही कामे सुरू होती. त्या बरोबरच रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचीही अनेक कामे सुरू होती. महापौरांनी दिलेल्या आदेशानुसार ३० एप्रिलनंतर कोणत्याही यंत्रणेला शहरात खोदाई करता येणार नसल्यामुळे खोदाईची कामे त्यानंतर थांबतील अशी अपेक्षा आहे. खोदाकाम थांबवण्याबरोबरच रस्ते पूर्ववत करणे, रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवणे, राडारोडा उचलणे, रस्त्यांसाठी वापरलेले अन्य साहित्य उचलणे अशी कामेही तातडीने सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र त्यानुसार कामे होताना दिसत नसल्याचा अनुभव पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना येत आहे.
जे रस्ते काँक्रिटीकरणासाठी खणले होते त्या रस्त्यांची कामेही अर्धवट सोडण्यात आली असून विविध वाहिन्या टाकण्यासाठी जेथे खोदाई करण्यात आली होती त्या रस्त्यांची डागडुजी देखील अतिशय सुमार दर्जाची झाली आहे. मध्य पुण्यात अनेक ठिकाणी अशा पद्धतीने जुन्या वाहिन्या बदलून तेथे नव्या वाहिन्या टाकण्याचे काम करण्यात आले असले, तरी रस्त्यांचे डांबरीकरण करताना रस्त्यांची पातळी सर्वत्र बिघडली असून बहुतेक सर्व ठिकाणी रस्ते उंचसखल झाले आहेत. त्यामुळे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्या ज्या ठिकाणी ड्रेनेजची कामे करण्यात आली आहेत त्या त्या ठिकाणी देखील कामे पूर्ण करण्यात आलेली नाहीत. रस्त्यातच राडारोडा टाकून ठेकेदार कामे सोडून गेल्याचे जागोजागी दिसत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना ठिकठिकाणी त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत.