‘कितीही वाट पाहीन पण, पीएमटीनेच जाईन’ हे पूर्वी पुण्यातील सार्वजनिक बससेवेबद्दल म्हटले जायचे. आशिया खंडातील सर्वाधिक दुचाकींचे शहर अशी पुण्याची ओळख असली तरी आजही कित्येक नागरिक बससेवेवरच अवलंबून आहेत. त्यामुळे सातत्याने चर्चेत असलेली पीएमपी बससेवा सुधारण्यासाठी आता ‘पीएमपी प्रवासी मंच’ने पुढाकार घेतला असून ‘पीएमपी मिशन १००’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारक येथे शनिवारी (१ नोव्हेंबर) सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, महापौर दत्ता धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, आमदार विजय काळे, मेधा कुलकर्णी, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे आणि पीएमपीचे संचालक प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती जुगल राठी यांनी दिली.
जुगल राठी म्हणाले,की दैनंदिन प्रवासामध्ये नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्या थेटपणाने प्रशासनापर्यंत पोहोचत नाहीत. संवादातील ही तफावत दूर करून प्रशासनास निधी आणि अधिकारासाठी वरिष्ठांकडे त्याचप्रमाणे सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. पीएमपीने प्रवास करणारे १०० प्रवासी मित्र आठवडय़ात किमान एक वेळ प्रवास करतील. १ नोव्हेंबरपासून सलग १०० दिवस दररोज एक याप्रमाणे हे मित्र प्रवासातील कौतुक-सूचना किंवा तक्रार ही निरीक्षणे नोंदवणार आहेत. दर दहा दिवसांनी मंचाचे कार्यकारी मंडळ पीएमपी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद बैठक करणार आहे. पीएमपीएमएल हेल्पलाईनचा वापर करा, असे आवाहन करणारी पत्रके वाटण्यात येणार आहेत. १०० दिवसांच्या या मोहिमेतील निरीक्षणे प्रवाशांमार्फत थेट पीएमपी प्रशासनाकडे नोंदविणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे.