भरमसाठ दरवाढ करताना पीएमपीने भाडेवाढीच्या समर्थनार्थ दिलेला प्रस्ताव आवश्यक माहिती दडवणारा आणि प्रवासीहिताच्या विरोधात असल्यामुळे हा प्रस्ताव मंजूर न करता त्याच्यावर जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी पीएमपी प्रशासनाकडे तसेच पुण्यातील लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली आहे. शहरातील तेरा स्वयंसेवी संस्थांनी ही मागणी केली असून भाडेवाढीचा प्रस्ताव रद्दच झाला पाहिजे, अशी या स्वयंसेवी संस्थांची मागणी आहे.
पीएमपीने वीस टक्के भाडेवाढ केली असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षातील भाडेवाढ त्याहूनही अधिक आहे. दैनंदिन, मासिक तसेच अन्य पासच्या दरात झालेली वाढ देखील पन्नास ते सत्तर टक्क्यांहून अधिक आहे. या दरवाढीला पीएमपी प्रवासी मंच आणि अन्य बारा संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. तसे निवेदन प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला बुधवारी देण्यात आले. पीएमपीची सेवा स्वस्त, सुरक्षित व सक्षम करणे आवश्यक असताना त्याकडे लक्ष न देता फक्त दरवाढ करून उत्पन्नवाढीचा मार्ग अवलंबला जात आहे. प्रत्यक्षात भाडेवाढीसंबंधी पीएमपीने मांडलेला प्रस्ताव चुकीचा आणि अन्याय्य आहे. तसेच या प्रस्तावात जी माहिती देणे आवश्यक होते ती देखील दडवण्यात आली आहे. उत्पन्नात कशाप्रकारे वाढ करणार, सध्याचे प्रवासी भारमान किती आहे, जाहिरात उत्पन्न, जागा भाडे उत्पन्न, अनुदान, प्रशासकीय खर्चात सुधारणा कशी करणार यासह कोणतीही माहिती पीएमपीने दिलेली नाही. त्यामुळे प्रवासीहिताच्या विरोधात असलेला हा प्रस्ताव पूर्णत: फेटाळावा, अशी आमची मागणी आहे, असे पीएमपी प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यापूर्वी ज्या ज्या वेळी दरवाढ करण्यात आली, त्या वेळी दरवाढ करूनही पीएमपीचे उत्पन्न वाढलेले नाही. उलट, प्रवासीसंख्या घटत आहे. त्यामुळे कोणत्याही दृष्टीने भाडेवाढीचा प्रस्ताव व्यवहार्य नाही, असे राठी म्हणाले.