पुणे : पुणे शहर आणि परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून दिवसभरात एक-दोन सरी आणि रिमझिम स्वरुपात पाऊस बरसत आहे. मात्र, शनिवारनंतर हे चित्र बदलणार असून, पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला. गुरुवारी (१२ जुलै) दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुणे शहर आणि परिसरामध्ये मागील आठवडय़ापासून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दिवसभरात एक ते दोन चांगल्या सरी कोसळतात. त्याचप्रमाणे काही वेळेला रिमझिम स्वरुपाचा पाऊस होतो. मात्र, शहराला झोडपून काढणारा पाऊस अद्याप झालेला नाही. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगल्या सरी कोसळत असल्याने धरणसाठय़ात समाधानकारक वाढ होत आहे. मागील दोन दिवस शहरात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. बुधवारी मात्र काही सरी कोसळल्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध भागात पावसाची भुरभुर सुरू होती. संध्याकाळी साडेपाचपर्यंत शहरात ०.३ मि. मी. पावसाची नोंद झाली. सध्या पावसाचे प्रमाण कमी असले, तरी शनिवारनंतर त्याचा जोर वाढू शकणार असल्याचे वेधशाळेकडून सांगण्यात आले.

दरम्यान, सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे. त्यामुळे राज्याच्या किनारपट्टीच्या भागामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. गुजरात, उत्तर पूर्व मध्यप्रदेश, ओडिशा या राज्यांवर हवेच्या वरील थरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भात चांगला पाऊस पडत आहे. येत्या ४८ तासांमध्ये उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.