आमची काय चूक होती? आम्ही कष्ट करणारे लोक दारोदारी जाऊन भांडी विकून मुलं लहानाची मोठी केली. पण पत्नीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने आता सगळे संपले असून साहेब माझ्या पत्नीचे डोळे पहिल्यासारखे सारखे करून द्या बाकी आम्हाला तुमचा पैसा अडका काही नको साहेब अशी मागणी शिरुरच्या पीडित महिलेच्या पतीने केली आहे.

यावेळी पीडित महिलेचा पती म्हणाला की, माझी पत्नी त्या रात्री प्रातःर्विधीसाठी गेली होती. तेवढ्यात माझा भाचा माझ्याकडे आला आणि म्हणाला की अरे तिकडे ती बाई पडली आहे. चल जाऊन पाहू या म्हणून गेलो. तर तिथे माझी बायको खाली रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेली दिसली. त्याच अवस्थेत गावातील दवाखान्यात घेऊन गेलो. पण तेथून पुढील उपचारासाठी आता ससून रुग्णालयात आणले आहे. पण एकच वाटत मला की आमच्या कुटुंबाची कधीच कोणाशी भांडण वैगरे काही नाही. आम्ही दोघे काम करून चार मुलांना वाढवले आहे. आता या घटनेने सर्व संपल्यासारखे झाले आहे असं पीडितेच्या पतीने म्हटलं आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील न्हावरे गावातील एक महिला प्रातःर्विधीसाठी दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास घराबाहेर गेली होती. त्याच दरम्यान एका तरूणाने महिलेची छेड काढली. त्यावर महिलेने प्रतिकार केला असता. त्या तरुणाने महिलेचा एक डोळा काढला. तर दुसरा डोळा निकामी केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर त्या पीडित महिलेला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ससून रूग्णालयात जाऊन पीडित महिलेची आणि कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर पीडित महिलेच्या पती सोबत संवाद साधण्यात आला.