पुणे : अरबी समुद्रातून येणारे बाष्प आणि राज्यावरून गेलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बहुतांश भागात पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी (२९ मे) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. कोकण आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस होता. राज्यात मोसमी पावसाचे आगमन होईपर्यंत काही भागांत पूर्वमोसमी पाऊस सुरूच राहणार असल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे.

राज्यावर सध्या कमी दाबाचे दोन पट्टे आहेत. एक पूर्व उत्तर प्रदेशापासून विदर्भापर्यंत, तर दुसरा पूर्व मध्य प्रदेशापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत आहे. हा दुसरा कमी दाबाचा पट्टा विदर्भ आणि तेलंगणामार्गे गेला आहे. याशिवाय अरबी समुद्रातून राज्याच्या दिशेने बाष्पही येत आहे. त्यामुळे राज्यात सध्या जोरदार वाऱ्यांसह पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांत संध्याकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकणातही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

विदर्भातील काही भाग वगळता यंदा संपूर्ण मे महिन्यामध्ये राज्यात पावसाळी स्थिती कायम राहिली आहे. त्यामुळे दिवसाचे कमाल तापमान अनेकदा सरासरीच्या खालीच राहिल्याने उन्हाचा चटका फारसा जाणवला नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात बहुतांश ठिकाणी २ जूनपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतरही मोसमी वाऱ्यांचा प्रभाव म्हणून काही दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाची स्थिती राहणार आहे. मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आठवड्यात ते तळकोकणातून राज्यात प्रवेश करतील. या संपूर्ण काळात कमी-अधिक प्रमाणात राज्यात पावसाची शक्यता असल्याने यंदा मोसमी पाऊस येईपर्यंत पूर्वमोसमी पावसाचा प्रभाव राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आजही जोरदार पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात २ जूनपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानुसार रविवारी (३० मे) मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे. काही भागांत विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.