निसर्गाच्या सानिध्यात लोणावळा परिसरात प्री-वेडिंग शूट करण्याची कल्पना अनेक जोडप्यांच्या मनात येत असते. त्यामुळे अनेक जण लोणावळा परिसरात अशा शूटिंगसाठी येत असतात. मात्र आता लोणावळ्यात एका ड्रोन चालकाला प्री-वेडिंग शूट करणं चांगलंच महागात पडलं आहे. आयएनएस शिवाजी आणि एअरफोर्स स्टेशन परिसरात हे ड्रोन शूटिंग केल्याने ड्रोन चालकाला तुरुंगाची हवा खावी लागली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने या परिसरात शूटिंग करण्यास बंदी आहे. कोणत्याही प्रकारच्या शूटिंगसाठी परवानगी घ्यावी लागते. प्री-वेडिंग शूट सुरु असताना तेथील कर्मचाऱ्यांनी लोणावळा शहर पोलिसांना याची माहिती दिली. मात्र तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाहून ड्रोन चालकाने धूम ठोकली. त्यानंतर लोणावळा पोलिसांनी ड्रोन चालकाचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. व्यंकटेश तेजस बोपन्ना (२६) असं अटक करण्यात आलेल्या ड्रोन चालकाचे नाव आहे. त्यांची जामीनावर सुटका झाली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांनी माहिती दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदल सेनेचे INS शिवाजी हे प्रमुख संरक्षण प्रशिक्षण संस्था असून प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्या ठिकाणी शूटिंग करण्यास बंदी आहे. असे असताना देखील ड्रोन चालक व्यंकटेश हा त्या परिसरात ड्रोनद्वारे प्री-वेडिंग शूट करत होता. त्याच परिसरात एअररफोर्स स्टेशनदेखील आहे. ही बाब INS शिवाजी येथे कार्यरत असलेल्या अलोक मिश्रा यांच्या लक्ष्यात आली. त्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याना माहिती दिली. तातडीने लोणावळा शहर पोलिसांना याची माहिती दिली. तर, अलोक मिश्रा आणि इतर अधिकाऱ्यांनी ड्रोन चालकाचा शोध घेतला असता गेटच्या जवळच ड्रोनचा वापर करत असल्याचं निदर्शनास आले. मात्र, अधिकारी, कर्मचारी तिथे पोहचेपर्यंत व्यंकटेश पळून गेला. त्यानंतर लोणावळा पोलिसांनी शोध घेऊन व्यकंटेशला अटक केली होती. दरम्यान, चौकशीत त्याने प्री वेडिंग शूट करत असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, नागरिकांना लोणावळा पोलिसांकडून याबाबत आवाहन करण्यात आलं आहे. प्रतिबंधित क्षेत्रात कोणीही विनापरवाना ड्रोनद्वारे शूटिंग करू नये ते बेकायदेशीर आहे आणि केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे लोणावळा पोलिसांनी आवाहन केले आहे.