गर्भवती व पंचेचाळीस वर्षांवरील महिलांना रेल्वेच्या प्रवासामध्ये ‘लोअर बर्थ’ देण्याबाबत रेल्वेने घेतलेल्या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत आहे. यासाठी रेल्वेच्या आरक्षणाच्या अर्जामध्ये बदल करण्यात येणार असून, नवे अर्ज लवकरच उपलब्ध होऊ शकणार आहे.
पूर्वी रेल्वेचे आरक्षण करताना अर्जामध्ये ज्येष्ठ नागरिक व डॉक्टरांसाठी रकाना ठेवण्यात आला होता. आरक्षणाच्या नव्या अर्जामध्ये आता गर्भवती महिलांसाठी नवा रकाना ठेवण्यात येणार आहे. आरक्षण करताना या अर्जासोबत गर्भवती महिलेचे वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित महिलेचे तिकीट प्रतीक्षा यादीत असले, तरी त्यांना ‘लोअर बर्थ’ ची जागा दिली जाणार आहे. मात्र, गर्भवती महिलेसोबत एक व्यक्ती असणे गरजेचे आहे.
रेल्वेच्या या निर्णयाबाबत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षां शहा म्हणाल्या की, गर्भवती महिलांना वरचे बर्थ प्रवासासाठी मिळाले, तर त्यांच्यासाठी ते खूपच त्रासदायक होते. त्यामुळे रेल्वेने हा बदल करून गर्भवती महिला व पंचेचाळीस वर्षांवरील महिलांना केवळ लोअर बर्थ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व श्रेणीमध्ये आरक्षण करणाऱ्या महिलांचा प्रवास सुखकर होईल. त्यामुळे हा निर्णय चांगला आहे. रेल्वेच्या सर्व क्लासच्या कोचमध्ये खाली व वर दोन बर्थ असतात ते फक्त महिलांसाठीच राखीव ठेवले पाहिजे. नव्या आरक्षण अर्जावर आता मोबाईल क्रमांकही लिहावा लागेल. आपत्कालीन स्थिती व एसएमएस सुविधेसाठी त्याचा उपयोग होईल. तिकीट आरक्षित झाल्यावर प्रवाशांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर त्याचा एसएमएस पाठविला जाईल. या सर्व योजना व सुविधा चांगल्या आहेत. रेल्वेने उशिरा का होईना चांगला निर्णय घेतला आहे.