‘‘मुद्रण हाच मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वाचा शोध असल्याचे मत ज्येष्ठ कवी जावेद अख्तर यांनी व्यक्त केले. आपल्या मनातील विचारांची अभिव्यक्ती मुद्रण कलेच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचू शकते,’’ असेही ते म्हणाले.
ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्स या संस्थेतर्फे मुद्रण क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना जावेद अख्तर यांच्या हस्ते राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऑफसेट प्रिंटिंग, डिजिटल प्रिटिंग, स्क्रिन प्रिंटिंग, फ्लेक्सोग्राफी या विभागामध्ये हे पुरस्कार देण्यात आले. पुणे प्रेस ओनरचे अध्यक्ष रवींद्र जोशी, संचालक गिरीश दाते आणि सचिव सुरेश कवडे या प्रसंगी उपस्थित होते.
जावेद अख्तर म्हणाले, ‘‘आपल्या देशामध्ये कल्पकता विपुल प्रमाणामध्ये आहे. फक्त या कल्पकतेस योग्य व्यासपीठ मिळायला हवे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. त्यामुळे पुण्यामध्ये मुद्रण क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये पुण्यातील वृत्तपत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. साहित्यिकाच्या मनातील विचार पुस्तकाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.’’