चिंचवडे नगर येथील एक मनोरूग्ण हायटेन्शन पोलवर चढल्याने सर्वाचेच धाबे दणाणले होते. दैव बलवत्तर म्हणून हा मनोरूग्ण थोडक्यात बचावला. त्याच्या या कृत्यामुळे मात्र सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता. समीर खान असे या मनोरूग्णाचे नाव असून रविवारी पहाटे चारच्या सुमारास तो चिंचवडे नगर येथील हायटेन्शन पोलवर चढला होता. अनेकांनी विनंती करूनही तो खाली येण्यास तयार नव्हता. अखेर साडेसात वाजता अग्निश्मन जवानांना पाचारण करण्यात आले. या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत या मनोरूग्णाला खाली आणले. विद्युतप्रवाह बंद असल्याने त्याचा जीव बचावला.

सविस्तर माहिती अशी की, चिंचवडे नगर येथे समीर खान (वय-२०, रा. श्रीराम नगर, चिंचवडे नगर) हा मनोरुग पहाटे चार वाजता घराशेजारी असणाऱ्या हायटेन्शन पोलवर चढला. तो ज्यावेळी पोलवर चढला, त्यावेळी सुदैवाने विद्युत प्रवाह बंद होता. आजूबाजूच्या नागरिकांना समीर पोलवर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला खाली येण्याची विनंती केली. पण तो कोणालाच जुमानत नव्हता. अखेरीस सकाळी साडेसात वाजता अग्निशमन दलाचे जवान त्याला खाली आणण्यासाठी त्या पोलवर चढले. पण जवान वर आल्यानंतर समीरने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर जवानांनी कसातरी त्याच्यावर ताबा मिळवला आणि दोरखंडाने त्याला बांधून सुरक्षितरित्या खाली सोडले. तब्बल चार तास समीर या पोलवर होता. अग्निशमन दलाला शर्तीच्या प्रयत्नानंतर यश मिळाले. या मनोरूग्णाला सुरक्षित उतरवण्यासाठी अशोक कानडे, शंकर पाटील, भरत फाळके, भूषण येवले, अमोल कंधार या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न केले.