पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारत विरुद्ध इंग्लड क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या आणि लावणाऱ्या 33 बुकींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील 8 जण हे घोरडेश्वर डोंगरावर जाऊन दुर्बिणीच्या सहाय्याने क्रिकेट सामन्याच्या प्रत्येक चेंडूवर लक्ष ठेवून मिळालेल्या दोन ते चार सेकंदात सट्टा लावत असल्याचं समोर आलं आहे. हे सर्व बुकी महाराष्ट्रातील आणि परराज्यातील आहेत अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाकड पोलिसांनी तीन ठिकाणी छापेमारी करून भारत विरुद्ध इंग्लड क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या आणि घेणाऱ्या 33 जणांना अटक केली आहे. संबंधित आरोपी हे गहूंजे क्रिकेट मैदानाजवळच राहण्यास होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली आहे.

दरम्यान, यातील आठ जणांना घोरडेश्वर डोंगरावरून अटक करण्यात आली असून ते दुर्बिणीच्या साहाय्याने प्रत्येक बॉलवर नजर ठेवून सट्टा लावत असल्याचं समोर आले आहे. वाकड पोलिसांनी 74 मोबाईल, 3 लॅपटॉप, 8 कॅमेरे, दुर्बीण, विदेशी नोटा असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.