पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाची पहिली बैठक सोमवारी बोलवण्यात आली असून चोवीस पदसिद्ध सदस्यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. प्राधिकरणाचे दैनंदिन कामकाज, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विविध अधिकार देणे, वित्तीय बाबींना अनुमती देणे, कामाचा आकृतिबंध तयार करणे, तसेच प्राधिकरणाची विकास योजना आणि विकास नियंत्रण नियमावली तयार करणे, विकास आराखडा तयार करण्यासाठी निविदा मागवणे आदी अनेक विषय या बैठकीच्या कार्यपत्रिकेवर ठेवण्यात आले आहे.
पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पुणे मेट्रोपोलिटिन रिजनल डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी- पीएमआरडीए) कार्यालय आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या इमारतीत सुरू करण्यात आले असून या नव्या कार्यालयात पीएमआरडीएची पहिली बैठक होत आहे. प्राधिकरण बैठकीच्या कार्यपत्रिकेवर अनेक विषय असून प्राधिकरणाच्या हद्दीसाठी विकास योजना (डेव्हलपमेंट प्लॅन) तयार करण्याचाही विषय या कार्यपत्रिकेवर आहे. प्राधिकरण हद्दीचा आधारभूत नकाशा करून घेणे, या क्षेत्रातील विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करणे अशी कार्यवाही प्राधिकरणामार्फत केली जाणार आहे.
प्राधिकरणाच्या हद्दीसाठी र्सवकष वाहतूक आराखडा तयार करणे, तसेच पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करणे, महानगर प्रदेश स्तरावरील सार्वजनिक सेवा, सुविधा व सोयींचा आराखडा तयार करणे, वारसा स्थळांचे संवर्धन व त्या संबंधीचा आराखडा तयार करणे, उद्योग, व्यवसाय, रोजगार निर्मिती व गुंतवणूक यांचा आराखडा करणे, प्रदेशातील पर्यटन स्थळांचा विकास आराखडा तयार करणे, पर्यावरण विषयक महत्त्वाच्या घटकांचे व्यवस्थापन व संवर्धन यांचा आराखडा तयार करणे, गृहनिर्माण धोरण व त्याचा आराखडा करणे असे विषय बैठकीपुढे असून विविध विषयांचे आराखडे तयार करण्याबरोबरच विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याचाही विषय बैठकीपुढे मांडण्यात आला आहे.
विविध विषयांशी संबंधित विकास आराखडे तयार करून घेण्याची कामे जागतिक स्तरावरील अनुभवी तज्ज्ञ सल्लागारांकडून करून घेतली जाणार असून त्यासाठी जागतिक स्तरावर निविदा मागवून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यासाठी नगर विकास खात्याचे सचिव, विभागीय आयुक्त, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पिंपरी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची समिती निविदांची छाननी व मूल्यमापन करेल. या समितीच्या मान्यतेनंतर सल्लागारांची नियुक्ती केली जाईल.