नगरसेवकांची आग्रही भूमिका

पुणे : नागरिकांच्या कररूपातून जमा झालेल्या पैशातून स्वत:ची फुकटची प्रसिद्धी करून घेण्यासाठी प्लास्टिक कचरा डब्यांसह, पिशव्या आणि अन्य वस्तूंचे वितरण करण्याच्या उद्योगाला चाप लावण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न सर्वपक्षीय नगरसेवकांनी ‘एकजूट’ दाखवत फोल ठरवला आहे. वस्तू वाटप बंद करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव नगरसेवकांनी उधळून लावला असून नगरसेवकांच्या वाढत्या दबावामुळे वाटपबंदीचा चांगला निर्णय घेणाऱ्या प्रशासनाने काही अटी-शर्तीवर वस्तू वाटपाला मान्यता दिली आहे. वेगवेगळी कारणे देत वस्तू वाटप हवेच, अशी ठाम भूमिका एक अपवाद वगळता अन्य सर्वच पक्षांच्या गटनेत्यांनी घेतली आहे. या उद्योगामुळे पुणेकरांच्या कररूपातून जमा झालेल्या पैशांचा मात्र अपव्यय होणार आहे. या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’ने महापालिकेतील सर्व गटनेत्यांची भूमिका जाणून घेतली. त्यातून वस्तू वाटपाबाबत सर्वच पक्ष आग्रही असल्याचे चित्र दिसत आहे.

केंद्राच्या सूचीतही वस्तूंचा समावेश

सरसकट वस्तूंचे वाटप करण्यास विरोध आहे. गैरप्रकार, पारदर्शकतेचा अभाव यामुळे नागरिकांच्या कराचा पैसा वाया जाणार आहे. वास्तविक वस्तूंचे वाटप करणे कायदेशीर आहे. कोणत्या वस्तूंचे वाटप करता येईल, याची यादी संकेतस्थळावर आहे.

दिलीप बराटे, विरोधी पक्षनेता

वस्तू वाटपाला विरोध

नागरिकांना कापडी पिशव्या, प्लास्टिकचे कचरा डबे वा अन्य वस्तू वाटण्यास विरोधच आहे. नागरिकांच्या कररूपातून जमा झालेल्या पैशाचा हा अपव्यय असून नगरसेवकांकडून स्वप्रसिद्धीसाठी त्याचा वापर होत आहे. त्यामुळे या पुढे अशा प्रकारच्या वस्तूंचे वाटप बंद होणे अपेक्षित आहे.   संजय भोसले, गटनेता, शिवसेना</p>

आवश्यकतेनुसारच वाटप

कचरा वर्गीकरणासाठी प्लास्टिकच्या कचरा डब्यांचे वाटप किंवा कापडी पिशव्यांचे वाटप किंवा बाक बसविणे ही प्रक्रिया नागरिकांच्या आवश्यकेनुसार होणार आहे. बेसुमार उधळपट्टी करण्याऐवजी मर्यादित निधीमध्ये वस्तूंचे वाटप करण्यात काही गैर नाही. नागरिकांच्या कररूपातून जमा होणाऱ्या पैशांचाही त्यामुळे अपव्यय होणार नाही. त्यासाठी प्रत्येक प्रभागात दहा लाखांपर्यंतच्या वस्तू वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे.

श्रीनाथ भिमाले, सभागृहनेता

वॉर्डस्तरीय निधीतून वाटप व्हावे

नागरिकांना विविध वस्तूंचे वाटप व्हावे, हा निर्णय महापालिकेने एकमताने घेतला आहे. तो कोणी एका नगरसेवकाने घेतलेला नाही. वॉर्डस्तरीय निधीतून ठराविक रकमेपर्यंतच्या वस्तू वाटपचा निर्णय झालेला आहे.  प्रक्रिया पारदर्शी राहावी.

-अरविंद शिंदे, गटनेता, काँग्रेस</strong>

कचऱ्याच्या शिस्तीसाठी वाटप हवे

नागरिकांना ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाची शिस्त लागावी यासाठीच नगरसेवकांकडून प्लास्टिकच्या कचरा डब्यांचे वाटप करण्यात येते. वाटपाच्या या प्रक्रियेत गैरप्रकार होऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना प्रशासनाकडून करणे आवश्यक आहे.

वसंत मोरे, गटनेता, मनसे