हडपसर भागात एका महाविद्यालयात अकरावीत शिकणाऱ्या तीन मुली मंगळवारी बेपत्ता झाल्या. बेपत्ता झालेल्या तिघी तुळजापूर येथे सापडल्या असून त्यांना तुळजापूर पोलिसांनी पालकांच्या ताब्यात दिले. दर्शनासाठी तुळजापूरला आल्याचे मुलींनी पोलिसांना सांगितले.

हडपसर भागातील तीन अल्पवयीन मुली मंगळवारी ( २३ ऑगस्ट) बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. एकाच वेळी तीन मुली बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. मुलींचे मोबाईल बंद असल्याने पोलिसांना तांत्रिक तपास करताना मर्यादा आल्या. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी एक मुलगी तिच्या मित्रासोबत हडपसरमधील एका उपाहारगृहात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने क ेलेले चित्रीकरण पडताळून पाहिले. पोलिसांनी तिच्या मित्राचा शोध घेतला. मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत तुळजापूर येथे जाणार असल्याची माहिती मित्राकडून पोलिसांना मिळाली. दरम्यान, हडपसरमधून बेपत्ता झालेल्या तीन मुली तुळजापुरात पोचल्या. तेथील निवासाची सुविधा असलेल्या एका हॉटेलमध्ये त्या गेल्या.

अल्पवयीन मुलींनी राहण्यासाठी खोली मागितल्याने हॉटेलचालकाला संशय आला. त्याने तेथील पोलिसांना ही माहिती दिली. तुळजापूर पोलिसांनी तिघींना ताब्यात घेतले आणि चौकशी सुरु केली. मध्यरात्री पोलिसांनी मुलींच्या पालकांशी संपर्क साधला. या घटनेची माहिती त्यांना दिली. त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्याचे पथक पालकांसोबत तेथे पोहोचले. बुधवारी दुपारी मुली पालकांसोबत हडपसरला पोचल्या. दर्शनासाठी तुळजापूरला गेलो होतो, अशी माहिती मुलींनी पोलिसांना दिली. हडपसर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.