सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरटय़ाने कपाटातील ४ लाख २५ हजारांचे दागिने लंपास के ले. मार्केट यार्ड भागातील वास्तूनगर सोसायटीत ही घटना घडली.

सुमन सोनवणे (वय ६६, रा. वास्तूनगर सोसायटी, मार्केट यार्ड) यांनी या संदर्भात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे यांनी रविवारी पहाटे सदनिकेचा दरवाजा उघडला. त्यानंतर त्या दरवाजा बंद करण्यास विसरल्या. चोरटय़ाने संधी साधली आणि त्यांच्या सदनिकेत प्रवेश केला. शयनगृहातील कपाटातील ४ लाख २५ हजारांचे दागिने लांबवून चोरटा पसार झाला. चोरटा माहितगार असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस उपनिरीक्षक आर. सी. पावरा तपास करत आहेत.

 

महिलेच्या गळ्यातीलमंगळसूत्र हिसकाविले

पुणे : हडपसर भागात पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकाविल्याची घटना घडली. या संदर्भात एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पादचारी महिला मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास भोसले गार्डन भागातून निघाली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटय़ांनी महिलेचे ५५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. उमरे तपास करत आहेत. शहरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, तसेच सोनसाखळी हिसकावणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.

 

कार्यालयातून रोकड चोरीला

पुणे : खासगी वित्तीय संस्थेच्या कार्यालयाचा दरवाजा बनावट चावीने उघडून चोरटय़ांनी ८९ हजार रुपये लंपास केले. नवी पेठ भागात मंगळवारी (१३ सप्टेंबर) रात्री ही घटना घडली.

श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि. चे विभागीय व्यवस्थापक मनोजकुमार नारायणदास शहा यांनी यासंदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी पेठेतील सागरदीप कॉम्प्लेक्समध्ये श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि. चे कार्यालय आहे. सोमवारी (१२ सप्टेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास कार्यालय बंद करून शहा आणि कर्मचारी घरी गेले. त्यानंतर मध्यरात्री चोरटय़ांनी कार्यालयाचा दरवाजा बनावट चावीने उघडला. तिजोरी उचकटून ८९ हजार ९०० रुपयांची रोकड लंपास करून चोरटे पसार झाले. सकाळी कार्यालय उघडण्यात आले तेव्हा चोरीचा प्रकार निदर्शनास आला.

 

कामगाराच्या मृत्यूप्रक रणी मंडप व्यावसायिकावर गुन्हा

पुणे : विसर्जन मिरवणुकीचा फ्लेक्स लावण्यासाठी बांबूचा पहाड उभारताना वीजवाहिनीचा धक्का बसल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी मंडप व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. वारजे भागातील पॉप्युलरनगर येथे शनिवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी ही दुर्घटना घडली होती.

दिलीप मारुती हनमघर (वय ३५,रा. दत्तनगर सोसायटी, वारजे)असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मंडप व्यावसायिकाचे नाव आहे. वारजे भागात एका मंडळाने विसर्जन मिरवणुकीच्या फ्लेक्ससाठी पहाड उभारण्याचे काम मंडप व्यावसायिक हनमघरला दिले होते. तीस फूट उंचीचा पहाड बांधताना शेजारी असलेल्या विजेच्या खांबावरील वाहिनीला कामगार भारत सखाराम कदम (वय ३०) याचा हात लागला. विजेचा धक्का बसल्याने कदम तीस फूट उंचावरुन कोसळला. बेशुद्धावस्थेतील कदमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तो मरण पावला. दरम्यान, मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच कदमच्या वृद्ध आईचा मृत्यू झाला होता. वारजे पोलिसांनी याप्रकरणाचा तपास केला. मंडप उभारणाऱ्या कामगार कदमला सुरक्षाविषयक साधने न दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मंडप व्यावसायिक हनमघरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक शंकर निम्हण यांनी दिली.

 

गणेशोत्सवात दागिने हिसकाविण्याचे सत्र सुरु

पुणे : मंगळवारी (१३ सप्टेंबर) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील ६२ हजारांचे मंगळसूत्र चोरटय़ाने लंपास केले.

अनिता भालेराव (वय ४६,रा. वारजे) यांनी यासंदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालेराव मंगळवारी दुपारी दर्शनासाठी मध्यभागात आल्या होत्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंडपात दर्शन घेत असताना भालेराव यांच्या गळ्यातील ६२ हजारांचे मंगळसूत्र चोरटय़ाने हिसकाविले.मंडपात दर्शनासाठी गर्दी होती. गर्दीतून बाहेर पडल्यानंतर मंगळसूत्र हिसकाविल्याचा प्रकार भालेराव यांच्या निदर्शनास आला. गणेशोत्सवात मध्यभागात महिलांचे दागिने लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.बेलबाग चौक ते मंडई दरम्यान भाविकांची मोठी गर्दी असते. चोरटय़ांची टोळी या भागात सक्रिय आहे. तेथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, चोरटय़ांनी दागिने हिसकाविण्याचे सर्वाधिक गुन्हे याभागात केले.