रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर केलेली पुणे- हजरत निजामुद्दीन ही आठवडय़ातून एकदा धावणारी नवीन वातानुकूलित एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते या गाडीचे सोमवारी उद्घाटन होणार आहे. कल्याण, वसई रोड, सुरत, रतलाम व कोटा या मार्गाने ही गाडी धावणार आहे.
उद्घाटनाची पहिली फेरी २३ मे रोजी निजामुद्दीन येथून सुरू होणार आहे. दुपारी चार वाजता निजामुद्दीनहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी हा गाडी पुण्यात येईल. या गाडीच्या नियमित फेऱ्या ३१ मे पासून सुरू होणार आहेत. ३१ मे ते २८ जून या कालावधीत निजामुद्दीनहून दर मंगळवारी ही गाडी पुण्यासाठी सोडण्यात येईल. २ जून ते ३० जून या कालावधीत दर गुरुवारी पुण्याहून निजामुद्दीनसाठी गाडी सोडण्यात येईल. १ जुलैपासून दर शुक्रवारी निजामुद्दीनहून, तर ३ जुलैपासून दर रविवारी पुण्यातून ही गाडी सोडली जाईल. निजामुद्दीनहून रात्री ९.३५ वाजता सुटून ही गाडी पुण्यात दुसऱ्या दिवशी रात्री ९.२५ वाजता येईल. पुण्यातून संध्याकाळी सव्वापाचला सुटून ही गाडी दुसऱ्या दिवशी निजामुद्दीनला संध्याकाळी ५.३५ वाजता पोहोचेल.उद्घाटनाच्या फेरीच्या गाडीचे आरक्षण २२ मे रोजी, तर नियमित फेऱ्यांचे आरक्षण २५ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. या गाडीला लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा या स्थानकांवर थांबा असणार आहे.