News Flash

‘एसएनडीटी’ च्या कन्या सायकलवरून गाठणार कन्याकुमारी

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला महाविद्यालयातील २५ विद्यार्थिनी सायकलवरून थेट कन्याकुमारीला जाणार आहेत.

| December 21, 2013 02:50 am

दुचाकीचे ‘सेल्फ स्टार्ट’ चे बटन दाबले अन् अॅक्सिलेटरवरची मूठ पिळली की शहरात कुठेही मनसोक्त प्रवास करू शकणाऱ्या आजच्या पिढीला सायकल चालवायची म्हटले तर जरा जीवावरच येते. अशा परिस्थितीत कुणी सायकलवरून थेट कन्याकुमारीला जाण्याचे ठरविले असेल आणि त्या जर महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनी असतील, तर अनेकांच्या भुवया उंचावतीत. पण, हे खरे आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला महाविद्यालयातील २५ विद्यार्थिनी सायकलवरून थेट कन्याकुमारीला जाणार आहेत.
मुख्य म्हणजे ही काही सहल नाही किंवा गंमत म्हणून या विद्यर्थिनी कन्याकुमारीला जाणार नाहीत. तर स्वामी विवेकानंदांच्या १५१ व्या जयंतीचे निमित्त साधून त्यांना मानवंदना देण्याबरोबर मार्गावरून जाताना या विद्यार्थिनी ‘सेव्ह गर्ल चाईल्ड’ व पर्यावरण वाचविण्याचा संदेशही देणार आहेत. त्यासाठी त्यांनी पथनाटय़ही तयार केले असून, मुक्कामाच्या प्रत्येक गावांमध्ये ते पथनाटय़ सादर करण्यात येणार आहे. स्त्री शक्तीची ओळख व विश्वास निर्माण करण्याचाही या माध्यमातून त्यांचा प्रयत्न आहे.

———- अशी केली विद्यार्थिनींची तयारी
सायकलवरून कन्याकुमारीला निघालेल्या सर्वच विद्यार्थिनींनी यापूर्वी कधीच गिअरची सायकल हाताळली नव्हती. किंवा सायकलिंग या प्रकाराचीही त्यांना माहिती नव्हती. त्यांच्यात एक अनोखी जिद्द निर्माण करण्याचे व सायकलिंगचे धडे देण्याचे काम त्यांच्याच प्राध्यापिका वासंती जोशी यांनी केले. सायकलवरून लेह, लडाखचा प्रवास, सायकलवरूनच नर्मदा परिक्रमा व सात वेळा एंडय़ूरोतील घवघवीत यश, असा अनुभव असलेल्या जोशी यांनी खऱ्या अर्थाने या मुलींमधील जिगर वाढविण्याचे काम केले.
जोशी यांनी चार महिने या विद्यार्थिनींकडून सायकलिंगचा सराव करून घेतला. पाच-सहा किलोमीटर अंतराने सुरुवात करून दिवसाला १०० ते १२० किलोमीटर अंतर सायकल चालविण्याचा सराव या मुलींनी केला. सायकलिंगबरोबरच व्यायाम, आरोग्य व सायकलची दुरुस्ती करण्याबाबतही विविध तज्ज्ञांकडून विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले आहे. जोशी याही विद्यार्थिनींसोबत असणार असून, मदतीसाठी इतर यंत्रणाही राहणार आहे. सरावासाठी डॉ. जयंत जोशी, श्री. भळगट व राधिका राऊत यांनीही पुढाकार घेतला. विद्यार्थिनींची जिद्द पाहून त्यांना मदत करण्यासाठी अनेकजण सध्या पुढे येत आहेत.
 
——— सतरा दिवस.. १६०० किलोमीटर

महाविद्यालयामध्ये २१ डिसेंबरला विद्यार्थिनींच्या सायकल रॅलीचे उद्घाटन होणार आहे. सायकलवरील प्रवास प्रत्यक्षात २२ डिसेंबरला सुरू होणार आहे. दररोज किमान १०० ते १३० कि.मी. अंतर प्रवास करण्यात येणार असून, दर पाच दिवसांनी विश्रांतीसाठी एक दिवस देण्यात येणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी स्थानिक संस्थांच्या मदतीने जनजागृतीचे कार्यक्रम केले जाणार आहेत. सातारा, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, बेडगी, चित्रदुर्ग, सिरा, बंगळुरू, कृष्णगिरी, सालेन, करुर, िदडीगुल, मदुराई, सत्तूर, तिररुनेलवेली, नागरकोईल या ठिकाणी मुक्काम करून ही सायकल रॅली कन्याकुमारीत पोहोचेल. १७ दिवसांच्या या प्रवासात १६०० किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 2:50 am

Web Title: pune kanyakumari bicycle tour by sndt girls
Next Stories
1 लष्करी जाचाला कंटाळलेल्या ग्रामस्थांचे दापोडीत आंदोलन
2 प्रकाशक सर्जेराव घोरपडे यांचे वृद्धापकाळाने निधन
3 वैद्यकीय योजनेतील गैरव्यवहार; पालिकेची शासनाकडून चौकशी
Just Now!
X