काय चाललंय प्रभागात

प्रभाग क्र. ५ : वडगावशेरी-कल्याणीनगर

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या वडगावशेरी विधानसभा मतदार संघात गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अनपेक्षित यश मिळाले आणि जगदीश मुळीक आमदार झाले. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी नव्याने अस्तित्वात आलेल्या वडगावशेरी-कल्याणीनगर (प्रभाग क्रमांक ५) येथेही स्वबळावर कमळ फुलविण्यासाठी भाजप आमदाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रभागात नाममात्र अस्तित्व असलेली काँग्रेस, शिवसेनेची वाढती ताकद आणि राष्ट्रवादीकडे असलेली इच्छुकांची मोठी संख्या अशा राजकीय परिस्थितीमध्ये उमेदवारीसाठी जोरदार काटाकाटी होणार असून प्रमुख लढत गाववाल्यांमध्येच रंगणार आहे.

[jwplayer PuSvtqP8]

या प्रभागात सर्वच राजकीय पक्षांकडे मोठय़ा संख्येने उमेदवार असले, तरी प्रभागातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे पक्षांतर होण्याचीही शक्यता असून हीच बाब गृहीत धरून राजकीय समीकरणे बांधण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीत नगर रस्त्यावरील प्रभाग क्रमांक १८ मधून आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक विजयी झाले होते. शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक सचिन भगत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन पठारे, बापूराव कर्णेगुरुजी, मीनल सरदवे यांचा मिळून हा एकत्रित प्रभाग नव्याने तयार झाला आहे. या प्रभागातून योगेश मुळीक हे भाजपचे एकमेव नगरसेवक निवडून आले आहेत. या राजकीय परिस्थितीमुळे एकमेकांचे हे पारंपरिक विरोधक पुन्हा आमनेसामने येणार असेच चित्र सध्या प्रभागात आहे. हा प्रभाग बहुभाषिक असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला ही निवडणूक काहीशी अडचणीची ठरेल, असे चित्र असले तरी शिवसेना मात्र भाजपला नेटाने तोंड देण्याच्या तयारीत आहे. प्रभागाची रचना स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता गलांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्ष सोडलाच नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत असले, तरी निवडणुकीच्या तोंडावर ऐन वेळी त्यांना संधी देण्याच्या हालचाली येथे सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणेही बदलण्यास सुरुवात झाली आहे.

महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युती होणार का नाही याचा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. मात्र या प्रभागात दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे युती न झाल्यास सेनेचे सचिन भगत हे भाजपच्या उमेदवाराविरुद्ध लढणार हे स्पष्ट आहे. गेल्या निवडणुकीत नारायण गलांडे आणि भीमराव गलांडे यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढली होती. त्यांच्यातील मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा योगेश मुळीक यांना झाला होता. या वेळी मात्र खुल्या गटासाठी दोन स्वतंत्र जागा असल्यामुळे एकमेकांच्या विरोधात उभे न राहण्याची व्यूव्हरचना आखण्यास सुरुवात झाली आहे. मात्र नारायण गलांडे हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार यावरच हे अवलंबून आहे. दुसऱ्या बाजूला मुळीक कुटुंबातील तगडा उमेदवार कसा मिळेल, या दृष्टीने शिवसेनेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर उमेदवारांचे भक्कम पॅनेल कसे करता येईल, याला सर्वच राजकीय पक्षांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या प्रभागातून मोठय़ा प्रमाणावर पक्षांतर होण्याचीही शक्यता आहे.

[jwplayer y8Pn2zMM]