पुणे शहरात दिवसभर पाऊस पडत असून त्याच दरम्यान कात्रज परिसरात झाड पडून तब्बल २२ दुचाकीचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.

कात्रज परिसरातील चौगुले इंडस्ट्रीजवळ एक मोठे झाड दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पडण्याची घटना घडली. या घटनेत तब्बल २२ दुचाकींचे नुकसान झाले आहे. दुचाकीवर पडलेले झाड बाजूला काढण्याचे काम सुरू असल्याचे अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. झाड पडल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. तसेच कोणीही या दुर्घटनेमध्ये जखमी झालेलं नाही.