केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्य़ांची माहिती पुणे पोलीस आयुक्तालयास हवी असून, शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत तत्काळ माहिती देण्याचे आदेश पुणे पोलिसांच्या सोमवारच्या गॅझेटद्वारे देण्यात आले आहेत. अनेक पोलीस ठाण्यांनी याबाबत त्यांच्याकडील माहिती आयुक्तालयाला दिलीही आहे.
या संदर्भात सर्व पोलीस ठाण्यांना गॅझेटद्वारे कळविण्यात आले आहे, ‘पोलीस उपायुक्त, दिल्ली यांच्याकडील जावक क्र. २१३९/१०१/एसईसी. दिनांक ९.३.२०१३ फॅक्स संदेश अन्वये मा. श्री. शरद गोविंद पवार, कृषिमंत्री, भारत सरकार (रा. मु.पो. बारामती, ता. बारामती, जि. पुणे) यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्य़ाबाबतची माहिती सद्य:स्थितीसह दि. १२.३.१३ रोजी ११ वाजेपर्यंत पीसीबी कार्यालयास तत्काळ पाठवावी. तसेच, माहिती निरंक असल्यास तसा अहवाल पीसीबी कार्यालयास पाठवावा.’ हा आदेश ‘सायबर व आर्थिक गुन्हे शाखे’ च्या पोलीस उपायुक्तांच्या नावे काढण्यात आला आहे.
याबाबत शहरातील काही पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, ‘गॅझेटद्वारे असा आदेश मिळाले आहेत. त्यानुसार आम्ही आयुक्तालयाला अहवाल पाठविले आहेत.’ मात्र, पवार यांच्यावरील गुन्ह्य़ांची माहिती कशासाठी हवी आहे, हे सांगण्यास पोलीस अधिकारी तयार नाहीत. याबाबत पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, अशी कोणतीही माहिती मागविण्यात आली नसल्याचे सांगितले.