नवीन लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीची हौस पूर्ण करुन तिला खूश ठेवण्याचा प्रत्येक नवऱ्याचा प्रयत्न असतो. पण, पुण्यात नवीन लग्न झाल्यामुळे पत्नीला खूश करण्यासाठी पठ्ठ्याने असं काही केलंय की त्याला आता तुरूंगाची हवा खावी लागतेय. पत्नीला खूश करण्यासाठी तो शहरातील दुकानांतून साड्यांची आणि ड्रेसची चोरी करायचा.

याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. रोहन बिरू सोनटक्के (वय २१, रा. वारजे माळवाडी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून तो साड्यांशिवाय मोबाइल, लॅपटॉप आणि गाड्याही चोरायचा असं समोर आलंय. पोलिसांनी त्याच्याकडून १८ मोबाइल, तीन लॅपटॉप, ३० साड्या, १२ ड्रेस, किराणा माल, आणि चोरलेल्या काही गाड्या असा जवळपास १३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे पथकासह हडपसर परिसरात गस्त घालत असताना सराईत गुन्हेगार रोहन सोनटक्के ॲमनोरा मॉलच्या मागे मोबाइल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने शहरातील विविध भागात घरफोडी आणि वाहनचोरी केल्याची कबुली दिली. त्याशिवाय नवीनच लग्न झाल्यामुळे पत्नीला खूश करण्यासाठी चोरी करीत असल्याची कबुली दिली. रस्त्याच्या कडेला वाहने थांबवून झोपलेल्या चालकाची नजर चुकवून कटावणीच्या साह्याने रोहन साड्यांची चोरी करीत होता. रोहन सराईत गुन्हेगार असून त्याने केलेले ९ गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.