बंगळुरु येथील एका एटीएमध्ये महिलेवर झालेल्या हल्ल्यानंतर पुण्यातील एटीएमची सुरक्षिततेबाबत पुणे पोलिसांनी शहरातील बँकांना परिपत्रक काढून सूचना केल्या आहेत. संबंधित बँकेच्या प्रबंधकाने सुरक्षा उपकरणे आणि उपाययोजनांची महिन्यातून दोन वेळा पडताळणी करावी, असे त्यात म्हटले आहे.
पुण्यातील एटीएमच्या सुरक्षिततेबाबत दहा दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांनी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात बँकांचे आणि सुरक्षा एजन्सीजचे अधिकारी यांची बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. त्या सूचनांचे परित्रपत्रक सर्व बँकांना पाठविण्यात आले आहे.
एटीएमचे शटर हे हॅन्डलने हळुवार उघडणारे असावे. ते उघडल्यानंतर वरच्या भागात लॉक करण्याची व्यवस्था असावी. एटीएमचा दर्शनी भाग काचेने बंद व पारदर्शक असावा. दरवाजाबाहेर व एटीएमध्ये भरपूर प्रकाश व्यवस्था असावी. दरवाजासमोरील आणि एटीएममधील भाग दिसतील अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. मात्र, ते कोणाला दिसू नयेत आणि खराब करता येणार नाही, अशा ठिकाणी बसवावेत. एटीएममध्ये जाणाऱ्या ग्राहकाला दरवाजा आतमधून लॉक करता यावा किंवा विशिष्ट प्रकारचे कार्ड स्व्ॉप केल्याशिवाय आतमध्ये जाता येणार नाही, अशी व्यवस्था असावी. एटीएमच्या आतमध्ये दोन ठिकाणी धोक्याचे संदेश देता येऊ शकेल, असे ठळक सायरनचे बटन असावे आणि सायरन हे एटीएमच्या बाहेर आणि सुरक्षित ठिकाणी बसविलेले असावे. एटीएमला चोवीस तास शस्त्रधारी कर्मचारी नेमण्यात यावा. सुरक्षा कर्मचारी नेमताना सैन्यदलातील निवृत्त कर्मचाऱ्याला प्राधान्य देण्यात यावे. सुरक्षारक्षकासाठी बँकेने स्वत:च्या नावावर शस्त्र परवाने घेऊन कर्मचाऱ्याला शस्त्र उपलब्ध करून द्यावे. एटीएम मशिन उलचून बाहेर नेता येणार नाही, असे बसविण्यात यावे. सुरक्षा रक्षकाने एटीएम सेंटरच्या बाहेर कोणतेही वाहन किंवा संशयित व्यक्तीला रेंगाळू देऊ नये. सुरक्षा रक्षकाकडे आणीबाणीच्या वेळी पोलीस नियंत्रण कक्ष, हद्दीतील पोलीस ठाणे, संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चौकी यांचे फोन क्रमांक उपलब्ध करून द्यावेत. त्यामुळे ताडतीच्या वेळी मदत मिळू शकेल. एटीएममध्ये एका वेळी एकच व्यक्ती उपस्थित राहील, हे सुरक्षा रक्षकाने कटाक्षाने पाळावे. एटीएममध्ये कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू लावण्यापूर्वी सुरक्षा रक्षकाने ती व्यक्ती अधिकृत आणि योग्य उपकरण लावत आहे, याची खात्री करावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.