पुणे विभागात महिन्याला १४५ कोटी ८७ लाखांचा ऑनलाइन भरणा

घरबसल्या आणि जगातून कोठूनही ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळ किंवा मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून वीजबिल भरण्याची सुविधा महावितरण कंपनीने सुरू केल्यानंतर सुरुवातीपासूनच पुणेकर आणि पुणे विभागातील ग्राहकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. सद्य:स्थितीत पुणे विभागात ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरणाऱ्यांची संख्या तब्बल सव्वाआठ लाखांवर पोहोचली आहे. मार्च महिन्यात ग्राहकांनी ऑनलाइन माध्यमातून १४५ कोटी ८४ लाख रुपयांच्या वीजबिलाचा भरणा केला आहे.

वीजबिलाचा ऑनलाइन भरणा करण्यात पुणेकर सुरुवातीपासूनच पुढे आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. सुरुवातीच्या काळामध्ये सुमारे लाखभर ग्राहक ऑनलाइन माध्यमातून वीजबिल भरत होते. मात्र, प्रत्येक महिन्याला त्यात भरच पडत चालली आहे. मार्चच्या एका महिन्यातील आकडेवारीनुसार या महिन्यात ८ लाख २१ हजार ९०१ ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल भरले. ग्राहकांची ही संख्या पुणे परिमंडलातील आजवरची सर्वाधिक संख्या ठरली आहे.

पुणे परिमंडलातील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसह हवेली, मुळशी, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालुक्यात ऑनलाइन वीजबिल भरण्यास मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

महावितरणचे संकेतस्थळ, मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून कोणत्याही ठिकाणाहून वीजबिल भरता येते. महावितरणच्या महाडीसकॉम या संकेतस्थळावर ऑनलाइन वीजबिल भरण्याची सुविधा आहे. त्याचप्रमाणे जून २०१६ पासून वीजग्राहकांसाठी मोबाइल अ‍ॅपची

निर्मिती करण्यात आली आहे.या अ?ॅपद्वारे चालू आणि मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी नेटबँकींग, क्रेडीट/डेबीट कार्डसह मोबाइल वॉलेट  आणि कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध आहे. वीजबिल भरल्यानंतर पावतीचा तपशीलही उपलब्ध करून दिला जातो.  ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वत:च्या अनेक वीजजोडण्यांबाबतही ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणचे संकेतस्थळ आणि मोबाइल अ?ॅपवरून वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

ऑनलाइन वीजबिलाचा विक्रम

मार्च महिन्यात पुणे परिमंडलात ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येचा विक्रमच नोंदविला गेला आहे. पुणे शहरातील ४ लाख ८८ हजार वीजग्राहकांनी ८२ कोटी ६० लाख रुपये ऑनलाइन भरले. पिंपरी चिंचवडमधील २ लाख ३१ हजार ग्राहकांनी ४२ कोटी ४ लाख, तर मुळशी, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालुक्यातील १ लाख २ हजार वीजग्राहकांनी २१ कोटी २४ लाख रुपयांचे वीजबिल ऑनलाइन पद्धतीने भरले आहे. शहरी भागाबरोबरच सध्या ग्रामीण विभागातही ऑनलाइन वीजबिल भरणा वाढला आहे.