गेली सहा दशके मनोरंजनाबरोबरच माहिती देत श्रोत्यांचे प्रबोधन करणारे आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे तीन दिवसांचे मौन सुरू झाले आहे. बाद झालेला जुना ट्रान्समीटर बदलून त्याजागी डीएमआर ही अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी तीन दिवस प्रक्षेपण बंद ठेवण्यात आले आहे. आकाशवाणी पुणे केंद्राच्या इतिहासामध्ये तीन दिवसांचा खंड पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आकाशवाणीचे पुणे केंद्र १९५३ मध्ये कार्यान्वित झाले. तेव्हापासून आकाशवाणीच्या कार्यक्रमांचे प्रक्षेपण ‘एमव्ही’वर (मीडियम वेव्ह) प्रसारित केले जात आहे. त्यासाठी उपयोगात येत असलेला ट्रान्समीटर १९८४ पासून कार्यरत आहे. गेली तीन दशके असलेल्या या ट्रान्समीटरचे आयुष्य संपले असल्याने हा ट्रान्समीटर बदलून त्याजागी डीएमआर ही अद्ययात यंत्रणा बसविण्याचे काम सोमवारपासून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या आधुनिक यंत्रणेमुळे प्रक्षेपणाचा आवाज सुस्पष्ट होणार आहे. गुरुवारपासून (१२ फेब्रुवारी) आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रक्षेपण सुरळीत होणार असल्याची माहिती केंद्र संचालक रागिणी यादव यांनी दिली.
जुन्या ट्रान्समीटरमध्ये व्हॉल्व्ह असून त्याचा आकार टय़ूबसारखा आहे. सध्या या प्रकारच्या टय़ूबची निर्मिती होत नाही. त्यामुळे हा ट्रान्समीटर बदलण्याखेरीज गत्यंतर नव्हते. नव्या डीएमआर तंत्रज्ञानामध्ये ‘इंटिग्रेटेड सर्किट’ असून त्यामुळे ट्रान्झिस्टरवरील प्रक्षेपणाची कार्यक्षमता वाढणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील काही ठिकाणांहून प्रक्षेपणाचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत नाही ही श्रोत्यांची तक्रारदेखील निकाली निघणार आहे. ट्रान्समीटर बदलण्याचे काम ४८ तासांत पूर्ण होणार आहे. तज्ज्ञांच्या समितीने त्याची पाहणी केल्यानंतर तीन दिवसांनंतर आकाशवाणीचे प्रक्षेपण पूर्ववत होणार असल्याची माहिती तांत्रिक विभागातील सूत्रांनी दिली.
 
विविध भारती ऐकू येणार
आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रक्षेपण तीन दिवस बंद ठेवण्यात आले असले तरी श्रोत्यांना विविध भारतीचे प्रक्षेपण ऐकता येणार आहे. पुणे केंद्राचे प्रक्षेपण एमव्ही म्हणजेच मीडियम वेव्हद्वारे होत आहे. एमव्हीचा ट्रान्समीटर बदलण्यात येत आहे. मात्र, विविध भारतीचे प्रक्षेपण ‘एफएम’वरून  (फ्रिक्वेन्सी मोडय़ूल) होत असल्याने विविध भारतीचे कार्यक्रम श्रोत्यांना ऐकता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.