करोनातही मनमानी भाडेआकारणीची रुग्णवाहिका सुसाट

पुणे : करोनाच्या काळातही मनमानी भाडेआकारणीच्या रुग्णवाहिका सुसाट असल्याचे वास्तव असून, गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णवाहिकेच्या भाडय़ाचा विषय दुर्लक्षितच राहिला आहे. आता येत असलेल्या तक्रारींमुळे राज्य शासनाकडून भाडय़ाबाबत निर्बंध आणण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने सात वर्षांपूर्वीच  रिक्षा, टॅक्सी आणि बसप्रमाणे रुग्णवाहिकांचे भाडेही निश्चित केले होते. पण, त्यावर प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही न झाल्याने ते केवळ कागदावरच राहिले आहे.

रुग्णवाहिकेच्या व्यवस्थेची गरज निर्माण होईल, अशी वेळ खरेतर कुणावरही येऊ नये. मात्र, कुठलाही प्रसंग सांगून येत नसल्याने कुणाला, कधीही रुग्णवाहिकेची गरज लागू शकते. अशा तातडीच्या वेळी रुग्णवाहिकेची सेवा घेतल्यास अगदी कमी अंतरापर्यंतही अवाच्या सवा रक्कम उकळली जात असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. प्रसंगाचे गांभीर्य आणि त्या वेळची गरज लक्षात घेता याची फारशी वाच्यता किंवा तक्रारही केली जात नाही. त्यामुळे रुग्णाचे नातलग मनमानी भाडेवसुलीला बळी पडतात. हीच बाब काही वर्षांपूर्वी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर आणि इतरांनी त्या वेळच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या लक्षात आणून देत रुग्णवाहिकांच्या भाडेनिश्चितीची मागणी केली होती.

परिवहन प्राधिकरणाला संबंधित विभागातील सार्वजनिक वाहतुकीतील भाडे ठरविण्याचा अधिकार असतो. त्यानुसार रुग्णवाहिकांचेही भाडे ठरविण्याची मागणी जोर धरत असताना रुग्णवाहिकांच्या सेवेचा अभ्यास करून २१ ऑगस्ट २०१३ रोजी रुग्णवाहिकांचे भाडेपत्रक जाहीर करण्यात आले. वाहनाचा प्रकार आणि अंतरानुसार भाडेनिश्चिती करण्यात आली. हे भाडेपत्रक प्रत्येक रुग्णालयात दर्शनी भागात लावण्याच्याही सूचना देण्यात आल्या. पण, भाडेपत्रक तयार करून आणि त्याबाबतच्या सूचना देऊन पुढे प्राधिकरणाने काहीच केले नाही. त्यामुळे हे भाडेपत्रक केवळ कागदावरच राहिले. प्रत्यक्षात ते कोणत्याही रुग्णालयाच्या दर्शनी भागातही लागले नाही. त्यामुळे रुग्णवाहिकांकडून भाडेआकारणीची मनमानी सुरूच राहिली. सध्याच्या करोना काळातही ही मनमानी थांबली नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आता राज्यपातळीवर भाडे ठरविण्याचे सूतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतेच केले आहे.

 

रुग्णवाहिकांची २०१३ मधील भाडेनिश्चिती

रुग्णवाहिकेचा प्रकार               २५ किमी किंवा दोन तास         प्रति किमी भाडे

मारुती व्हॅन                             २५० रुपये                                    ९ रुपये

टाटा सुमो व मॅटॅडोर                ३०० रुपये                                    १० रुपये

टाटा ४०७, स्वराज माझदा         ५०० रुपये                                   १२ रुपये

आयसीयू व वातानुकूलित         ७०० रुपये                                   २० रुपये