६५ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सत्र चौथे

पं. तुषार दत्त यांच्या गायनाने शनिवारच्या स्वरमहोत्सवाची सुरुवात झाली. त्यांनी ‘गौड सारंग’ हा बडा ख्याल एकतालात सादर केला. बोल होते ‘गोरी तोरे नयना’ तर द्रुत तीनतालात ‘दिन देखे चैन नही आयी रे’ हे बोल असलेली बंदिश होती. ‘शिवरंजनी’ रागात ‘चार दिनोकी प्रीत हमारी’ हे बोल असलेला ‘दादरा’ सुरेख मांडला. तसेच ‘मन भाया साँवरिया’ हे भजन ‘मिश्र मांड’ रागात सादर केले. हे गायन भावपूर्ण होते. गमकयुक्त आलापी, किंचित अनुनासिक मधाळ आवाज, बोलतानामधूनही रागाचे स्वरूप व्यवस्थित प्रतित होत होते. द्रुतातील बंदिशही दाद देऊन गेली. ‘मिश्र मांड’मधील सौंदर्य ज्याला समजले त्याला सर्व रागांतील सौंदर्य समजले असे. पं. अभिषेकीबुवा म्हणत. त्याचा प्रत्यय हे गायन ऐकून श्रोत्यांना आला.

पं. अभय रुस्तम सोपोरी यांचे संतूरवादन झाले. शततारी वीणा, ज्याला शंभर तारा असतात. संत तुकाराममहाराज यांच्या अभंगानुसार ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशा आनंद तरंगाच्या लहरी प्रसृत करणारे हे काश्मिरी वाद्य आहे. सोपोरी यांनी या वाद्यावर पं. भीमसेनजींच्या या स्वरदरबारात त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राग ‘भीम’ सादर केला. वास्तविक या वाद्यामधून गमक, घसीट व सूंथ निघतच नाही. ही उणीव या कलाकाराने भरून काढली. सारंगीवर जसे गज फिरवून स्वर निघतात तसे वरील गमक, घसीट, सूंथ बऱ्याच प्रमाणात आसयुक्त काढून दाखविले. पण हे फक्त अनिबद्ध, आलापीतच. पुढे नेहमीप्रमाणेच ‘कोसळती स्वरधारा.’  आलाप, पुढे पखवाजच्या साथीत गत, मध्य एकतालात विविध लयकारीने वाजविली. द्रुत त्रितालात वेगवान ताना घेऊन अनेक ठिकाणी श्रोत्यांची दाद मिळवली.

पं. भीमसेन जोशी यांचे शिष्योत्तम पं. उपेन्द्र भट यांचे गायन झाले. त्यांनी ‘ख्याल दुर्गा’ सादरीकरणासाठी निवडला. विलंबित एकतालात ही बंदिश होती. बोल होते ‘रसिका..’ तसेच पंडित भीमसेनजींची ‘चतर सु’ ही प्रसिद्ध बंदिश द्रुत त्रितालात दमदारपणे सादर केली. उपेंद्रजींचा दमसास चांगला आहे. लांबलचक आलाप ताना निघत होत्या. शेवटी याच रागातला तराणा गमकेच्या, तंतकारीने गायला. त्यानंतर ‘करुणा क्यू नही आये’ ही पं. फिरोज दस्तूर यांनी अमर केलेली ठुमरी सादर केली. शेवटी ‘अवघा आनंदी आनंद’ हा श्रवणीय अभंग गाऊन आपले घरंदाज गायन थांबविले. त्यांना स्वरसंवादिनीवर उमेश पुरोहित यांनी, तबल्यावर मनोज भांडवलकर यांनी तर, सारंगीवर ईर्शाद खाँ यांची साथसंगत होती.

विदुषी आरती अंकलीकर यांनी आपल्या सादरीकरणासाठी ‘रागेश्री’ हा ख्याल निवडला. बंदिशीचे बोल होते ‘सुमीरन करत राम.’ विलंबित रुपक तालात ही बंदिश अतिशय बांधेसूद होती. जयपूर-अत्रौली घराण्याच्या परंपरेनुसार स्वरांचे विविध मेरुखंड करून आलाप, तानात विविधता, लयकारीच्या अंगाने करण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. असे बुद्धिनिष्ठ, तर्कसंगत आलाप, ताना ऐकावयास मिळाले. आकारयुक्त आलापी, गळ्यात उत्तम फिरक यामुळे हे गायन रसपूर्ण होते. द्रुत त्रितालामधील तिल्लाणा, नंतर काफी टप्पा ‘पुष्टु’ या सात मात्राच्या तालात सादर केला. द्रुत त्रितालात ‘आज कैसी ब्रीजमे धूम मचायी’ गात टप्पा गायन थांबवले. रसिकांच्या खास आग्रहास्तव ‘बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल’ हा संत तुकारामांचा अभंग सादर केला.