तब्बल ८८ हजार ३०६ विद्यार्थी सोमवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्या घेणार आहेत. विद्यापीठाचा नामविस्तार झाल्यानंतरचा हा पहिलाच पदवीप्रदान समारंभ आहे. विशेष म्हणजे यातील ४०५ विद्यार्थ्यांना पीएच.डी.ची पदवी मिळणार असून विद्यापीठातून पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत ७५ ने वाढ झाली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २ मार्च रोजी होणाऱ्या या पदवीप्रदान समारंभासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष ए. एस. किरण कुमार उपस्थित राहणार आहेत. यंदा ६१ विद्यार्थ्यांनी एकूण १०० सुवर्णपदके पटकावली आहेत. यातील सर्वाधिक २२ सुवर्णपदके शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनी तर त्या खालोखाल १८ सुवर्णपदके कला शाखेतील विद्यार्थ्यांनी मिळवली आहेत. मोनिका दत्तू कांडेकर ही नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाची विद्यार्थिनी ‘डॉ. शंकरदयाळ शर्मा सुवर्णपदका’ची मानकरी ठरली आहे. एकूण ८८ हजार ३०६ विद्यार्थी सोमवारी पदवी ग्रहण करणार असून यात ६२ हजार ९१८ विद्यार्थी पदवीचे तर २५ हजार १६५ विद्यार्थी पदव्युत्तर पदवीचे आहेत.
नुकत्याच राज्यपालांबरोबर झालेल्या शासकीय बैठकीबद्दलही गाडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘नवीन विद्यापीठ कायदा आणण्याबाबत शासन गंभीर असून या कायद्याचा मसुदा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. कायद्यासंबंधी सूचना करण्यासाठी विद्यापीठांना १५ दिवसांचा अवधीही देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या कायद्याबाबत निर्णय झाला नाही, तरी सप्टेंबर-ऑक्टोबपर्यंत नवीन कायदा येईल असे चित्र आहे. क्रेडिट पद्धती आणण्याच्या मुद्दय़ासंबंधी असलेल्या अडचणी मी शासनासमोर मांडल्या. प्राध्यापकांची पुरेशी संख्या आणि या प्राध्यापकांना क्रेडिट गुणपद्धतीची पूर्ण माहिती असल्याशिवाय ही पद्धत राबवता येणार नाही. २०१५-१६ पासून अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षांला क्रेडिट पद्धती राबवण्यापासून सुरुवात करता येईल.’’