‘पैसे देऊन वेतनवाढ करण्याचे प्रकार घडतातच.. आम्हीच असे वेगळे काय करतो आहोत?’ असा प्रश्न वेतनवाढ मिळण्यासाठी लाच गोळा करणाऱ्या पुणे विद्यापीठातील उपकुलसचिवांना पडला आहे. विद्यापीठामध्ये अशा प्रकारे लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांनी आपली पदोन्नती आणि वेतनवाढ केली असल्याचे विद्यापीठातील एका माजी उपकुलसचिवांनी सांगितले.
वरची वेतनश्रेणी मिळून पगार वाढण्यासाठी पुणे विद्यापीठातील उपकुलसचिवांकडून प्रत्येकी लाख रुपये गोळा करण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव पुढे करण्यात येत असून त्याच्याकडे प्रत्येकी एक लाख रुपये जमा केले, की सगळ्या उपकुलसचिवांची वेतनवाढ होईल, असा विश्वास उपकुलसचिवांना देण्यात आला आहे. याबाबत ‘लोकसत्ता’ने गुरुवारी वृत्त प्रसिद्ध केले आहे.
त्यानंतर ‘आपले नेमके काय चुकले. ’ असा नवाच प्रश्न उपकुलसचिवांना पडल्याचे समजते. ‘उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्याकडे विशिष्ट रक्कम पोहोचवणे आणि त्यानंतर शासन निर्णय जाहीर करून वेतनवाढ घेणे हे यापूर्वीही घडले आहे. मग आम्ही असे वेगळे काय केले,’ अशी कुजबूज विद्यापीठातील अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. पुणे विद्यापीठातच एका अधिकाऱ्याला उच्च शिक्षण विभागात लाच देऊन वेतनवाढ मिळाल्याचे प्रकरण यापूर्वीही गाजले होते. त्याचप्रमाणे विद्यापीठातील काही लिपिकांनीही यापूर्वी अशा प्रकारे पदोन्नती आणि वेतनवाढ मिळवली असल्याचे विद्यापीठातील एका माजी उपकुलसचिवांनी सांगितले. मुळात सगळाच चोरीचा मामला असल्यामुळे याबाबत उघड चर्चा होत नाही. त्याचप्रमाणे बहुतेकांचे हात या प्रकरणात गुंतलेले असल्यामुळे याबाबत आक्षेपही घेतले जात नाहीत, असेही काही माजी अधिकाऱ्यांनी सांगितले.
शासनाकडून निर्णय आला, की उच्च शिक्षण विभागाला त्याची अंमलबजावणी करावीच लागेल. तोपर्यंत शासन निर्णयाचा आधार घेऊन विद्यापीठ फंडातून वेतनातील फरकही घ्यायचा अशी योजना उपकुलसचिवांनी आखल्याचे समजते आहे. मुळातच उपकुलसचिव हेच विद्यापीठाचा प्रशासकीय आधार असल्यामुळे विद्यापीठ फंडातून फरक मिळण्यासाठी दबाव तंत्र वापरणेही त्यांच्यासाठी सोपे आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला आहे, अशी माहिती काही माजी अधिकाऱ्यांनी दिली आहे.