मद्य दुकानांपुढे रांगा कायम; मिळेल तितक्या मद्याची खरेदी

पुणे : प्रतिबंधित क्षेत्र वगळून मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्यास मान्यता मिळाल्याने दीड महिन्यांहून अधिक काळ ‘घसा कोरडा’ झालेल्या मद्यग्राहकांत निराळाच ‘उत्साह’ संचारला आहे.  ‘कुठे सुरू आहे रे..’ अशी फोनाफोनी होताच अगदी सकाळपासूनच ते खरेदीच्या ‘मोहिमे’वर रवाना होत आहेत.  कुठे शिस्तीत, तर अनेक ठिकाणी सामाजिक अंतराचे भान गुंडाळून खरेदी होत आहे. चढलेल्या तापमानाच्या पाऱ्यात भाजी खरेदीसाठी जाणवणारा तीव्र चटका मद्यखरेदीच्या रांगेत मात्र सौम्य झालेला दिसतो. पोलिसांची एखादी काठी खाण्याची तयारी ठेवण्याबरोबरच पुन्हा बंदी येते की काय, या भीतीपोटी मिळेल तितकी खरेदी करण्याचीही ‘दक्षता’ही घेतली जात आहे..

राज्य शासन आणि पाठोपाठ पालिकेने काढलेल्या आदेशानुसार सोमवारपासून (४ मे) शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह एका रस्त्यावर इतर पाच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. टाळेबंदीच्या कालावधीत पुणेकरांसाठी हा किंचित दिलासा होता. मात्र, मद्यग्राहकांसाठी हा आदेश पर्वणीच ठरला आहे. दुकाने उघडी ठेवण्याच्या पहिल्या दिवशी काही प्रमाणात गोंधळाची स्थिती होती. उघडय़ा केलेल्या मद्य दुकानांपुढे सकाळीच मोठय़ा रांगा होत्या. बंद दुकानांपुढेही अनेक जण घुटमळत होते. सामाजिक अंतराचा नियम पाळला जात नसल्याने अनेकांना पोलिसांच्या काठीचा प्रसादही मिळाला. त्यातही अनेकांनी मद्याची खरेदी करीत पुरस्काराचे स्मृतिचिन्ह मिळाल्याच्या थाटात मद्य बाटल्या नेल्या.

मंगळवारी (५ मे) दुसऱ्या दिवशी शहरात अनेक ठिकाणी मद्य दुकाने उघडी होती आणि त्यापुढील रांगही कायम होती. सध्या शहरात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचला आहे. त्यामुळे दुपारी उन्हाचा तीव्र चटका जाणवतो आहे. अशा चटक्यातही मद्य दुकानांपुढे रांगा लागल्या होत्या. काही दुकानदारांनी अडथळे उभे करून सामाजिक अंतर राखण्याची व्यवस्था केली होती. मात्र, पोलीस नसलेल्या ठिकाणी हे अंतर राखले जात नव्हते. गस्तीवर असलेले पोलीस दुकानाच्या ठिकाणी आल्यानंतर गर्दी करणाऱ्यांना काठीचा प्रसाद दिला गेला. पण, पोलीस जाताच परिस्थिती पुन्हा जैसे-थे होत होती. रांग मोडून जाणारे आणि रांगेत थांबलेले ग्राहक यांच्यात अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडले.

मद्य दुकान वेळेत उघडे, इतर बंद..

राज्य शासनाने काढलेल्या आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंसह एका रस्त्यावर इतर पाच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या सर्व दुकानांसाठी सकाळी १० ते संध्याकाळी ६ ही वेळ देण्यात आली आहे. मात्र, दारूची दुकाने वगळता इतर दुकाने १२ वाजताच बंद होतात. दारू विक्री मात्र ठरलेल्या वेळेनुसार अगदी तंतोतंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू ठेवली जाते आणि संध्याकाळपर्यंत रांगाही कायम असतात.