मोसंबीच्या आंबेबहराला पावसाचा फटका बसला आहे. यंदाचा आंबेबहार हंगाम दोन महिने आधीच संपणार असून श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात सध्या मोसंबीची आवक कमी होत आहे. आवक कमी झाल्याने घाऊक तसेच किरकोळ बाजारात मोसंबीचे दर २० टक्क्य़ांनी वाढले आहेत.

मोसंबीची आवक कमी होत चालल्याने डिसेंबर महिन्यात मोसंबीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता मार्केट यार्डातील मोसंबीचे व्यापारी सोनू ढमढेरे यांनी व्यक्त केली. मोसंबीचा आंबेबहार दरवर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू होतो. डिसेंबर महिन्यापर्यंत मोसंबीची आवक सुरू राहते. यंदाच्या वर्षी पाऊस जादा झाल्याने मोसंबीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. पाऊस तसेच मोसंबीवर माशी नावाच्या रोगाने परिणाम झाला आहे. त्यामुळे आंबेबहारातील मोसंबीच्या उत्पादनात घट झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरवर्षी आंबेबहार मार्केट यार्डातील फळबाजारात दररोज ७० ते ८० टन मोसंबीची आवक होत असते. यंदा मोसंबीच्या उत्पादनात घट झाल्याने आवक कमी झाली आहे. सध्या बाजारात ४० ते ५० टन एवढी आवक होत आहे. औरंगाबाद परिसरातून मोसंबीची आवक सुरू आहे. पावसामुळे मोसंबीच्या प्रतवारीवरही परिणाम झाला आहे. आवक होत असलेल्या मोसंबीत हिरव्या मोसंबीचे प्रमाण जास्त आहे. नेहमीच्या तुलनेत गोडीही कमी आहे. घाऊक बाजारात ३ डझन मोसंबीला १५० ते ३२० रुपये असा दर मिळाला आहे. चार डझन मोसंबीला (आकाराने लहान) ६० ते १३० रुपये असा दर मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोसंबीचे दर जास्त आहे. किरकोळ बाजारात सध्या मोसंबीची १०० ते १२० रुपये डझन या दराने  विक्री केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

जानेवारीत मोसंबीचा दुसरा बहर

जानेवारी महिन्यात मोसंबीचा मृगबहार सुरू होणार आहे. या हंगामात मोसंबीचे उत्पादन कमी होणार आहे. डिसेंबर महिन्यात तर घाऊक बाजारात तीन डझन मोसंबीचे दर प्रतवारीनुसार ५०० ते एक हजार रुपयापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे, असे मोसंबीचे व्यापारी सोनू ढमढेरे यांनी सांगितले.