पुण्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहिल्यानंतर रविवारी मध्यरात्री आणि सोमवारी अधूनमधून पावसाच्या सरींनी हजेरी लावली. या काळात पडलेल्या पावसाची नोंद ५.१ मिलिमीटर इतकी झाली. दरम्यान, शहरात मंगळवारीसुद्धा काही सरी पडतील, अशी शक्यता वेधशाळेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. पुण्याप्रमाणेच महाबळेश्वर येथेही रविवारी आणि सोमवारी दमदार सरी पडल्या.
हेलन चक्रीवादळाचा परिणाम म्हणून देशाच्या पूर्व किनारपट्टीवर गेले काही दिवस जोरदार पाऊस झाला. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याच्यामुळे राज्याच्या अनेक भागात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पावसाच्या सरीसुद्धा पडल्या. पुण्यात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास शहराच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सकाळपर्यंत अधूनमधून सरी पडत होत्या. सोमवारी संपूर्ण काळ शहरात शहरावर ढगांचे आवरण होते. हवेतील गारवा आणि अधूनमधून पडणाऱ्या सरी यामुळे चिंब पावसाळी वातावरण होते. दोन दिवसांसाठीच पण पुणेकरांनी डिसेंबर महिन्यातही पावसाळय़ाचा अनुभव घेतला. पुणे वेधशाळेत सोमवारी सकाळपर्यंत १.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर सोमवारी सायंकाळपर्यंत ३.२ मिलिमीटर पाऊस पडला.
वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुण्यात मंगळवारीसुद्धा ढगाळ हवामान कायम राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेत गारवा असेल, पण किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असेही सांगण्यात आले. पुण्याप्रमाणेच राज्याच्या अनेक भागात रविवारी व सोमवारी ढगाळ वातावरण होते. महाबळेश्वर येथे सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत २४.२ मिलिमीटर पाऊस पडला, तर भीरा येथे १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.