दुपापर्यंत हलक्या सरी, धुक्याचीही अनुभूती

पुणे : ऐन थंडीच्या हंगामात पुणे शहर आणि जिल्ह्यत सोमवारचा दिवस पावसाळी ठरला. रविवारी रात्रीही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सोमवारी मात्र सकाळपासून कोसळणाऱ्या हलक्या सरी दुपापर्यंत कायम होत्या. शहराने काही प्रमाणात धुक्याची अनुभूतीही घेतली. दिवसभरात शहरात ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहर आणि परिसरात मंगळवारीही (१५ डिसेंबर) हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

अरबी समुद्राच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यानंतर गेल्या आठवडय़ापासून राज्यासह पुणे शहर आणि परिसरातही ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवडय़ातही एक-दोनदा शहरात पावसाचा शिडकावा झाला होता. मात्र, सध्याच्या स्थितीनंतर सोमवारी मोठय़ा पावसाची नोंद झाली. शिवाजीनगर केंद्रावर ५ मिलिमीटर, तर लोहमाग केंद्रात २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी रात्री अकराच्या सुमारास शहराच्या काही भागात जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर सोमवारी सकाळपासूनच आकाश ढगाळ झाले होते. सकाळी साडेआठच्या सुमारास हलक्या सरी झाल्या. या वेळेत घराबाहेर पडलेल्या नागरिकांची त्यामुळे तारांबळ उडाली. काही वेळात पाऊस थांबेल, असे वाटत असताना ढगांमुळे अंधारून आले. जणू पावसाळ्याचेच दिवस असावेत, असे वातावरण पुणेकरांनी अनुभवले.

डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात काही प्रमाणात थंडी अवतरल्याने उबदार कपडे घालावे लागत होते. त्यानंतरच्या ढगाळ स्थितीत काही प्रमाणात उकडू लागले आणि आता पाऊस पडल्याने रेनकोट आणि छत्र्याही घरातून बाहेर निघाल्या. सोमवारी दुपारी दोनपर्यंत अनेक भागांत हलक्या सरी कायम होत्या. पावसाच्या दरम्यान सकाळपासून अनेक ठिकाणी धुक्याची चादर निर्माण झाली होती. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार मंगळवारीही शहरातील आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर  १६ डिसेंबरपासून आकाश मुख्यत: निरभ्र राहील.

तापमानात झपाटय़ाने बदल

सोमवारी सकाळपासून शहरात पावसाच्या सरी कोसळल्याने दिवसाच्या कमाल तापमानात झपाटय़ाने बदल झाला. दोन ते तीन दिवसांपूर्वी ३० अंश सेल्सिअसच्या पुढे असलेले कमाल तापमान सोमवारी २३.६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. हे तापमान सरासरीच्या तुलनेत ५ अंशांनी कमी होते. त्यामुळे दिवसभर हवेत काही प्रमाणात गारवा जाणवत होता. रात्रीचे किमान तापमान मात्र अद्यापही सरासरीपुढेच आहे. सोमवारी १७.७ अंश किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा तब्बल ६.५ अंशांनी अधिक आहे.