पुणे जिल्ह्य़ाच्या हद्दीतून रक्तचंदनसाठा संरक्षणात बाहेर पाठविण्यामध्ये ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखाचे (एलसीबी) पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले होते. मात्र, प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्यानंतर कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली, पण पोलीस अधिकाऱ्यांची अद्यापही चौकशीच सुरू आहे. दरम्यान, रक्तचंदनाची तस्करी करणारा मुख्य आरोपी दीपक झरे याच्या अटकेनंतर पोलिसांचा सहभाग समोर येणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पोलीस झरेच्या मागावर आहेत.
चाकणजवळ वाकी-बुद्रुक गावात गोदामावर छापा टाकून पोलिसांनी २५ जानेवारी २०१३ रोजी एक कोटीपेक्षा जास्त किमतीचा रक्तचंदनाचा साठा जप्त केला होता. पण, रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या मुख्य आरोपीला छाप्याची माहिती अगोदरच मिळाल्यामुळे तो पळून गेला होता. चाकण पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास करून दीपक पद्मनाभन नायडू या आरोपीला मार्च महिन्यात अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत दक्षिण भारतातून चाकणमार्गे रक्तचंदनाची तस्करी होत असल्याचे समोर आले. त्याच बरोबर पुणे विभागातून रक्तचंदनाचे ट्रक पुणे जिल्ह्य़ाच्या हद्दीबाहेर पोहोचविण्यामध्ये ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मदत केल्याचे समोर आले होते.
याप्रकरणाची चौकशी अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केली. त्यांनी केलेल्या चौकशीत एलसीबीचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दोषी असल्याचे आढळून आले. त्यानुसार तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले, तर एलसीबीचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली होती. चाकण पोलिसांनी छापा टाकण्याच्यापूर्वी दोन दिवस अगोदरच एलसीबीला रक्तचंदनाच्या तस्करीची माहिती मिळाली होती. एलसीबीच्या पथकाने रक्तचंदनाच्या गोडाऊनमध्ये जाऊन आरोपींकडे एक कोटी रुपयांची मागणी केली. तडजोडीमध्ये साठ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार एलसीबीला पंधरा लाख रुपयांचा पहिला हप्ताही मिळाला. या वेळी गोकावे हे उपस्थित असल्याचे चौकशीत आढळून आले होते. याप्रकरणी अजूनही त्यांची चौकशीच सुरू आहे.
या तस्करीचा तपास चाकण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बी. आर. पाटील करत आहेत. त्यांनी आतापर्यंत या गुन्ह्य़ात सहा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडे तपास केल्यानंतर रक्तचंदन दक्षिण भारतातून बंदरापर्यंत पोहोचविणारा मुख्य आरोपी दीपक झरे हा फरार आहे. झरे हा एका गुन्ह्य़ात येरवडा कारागृहात होता. त्याला यातील तीन आरोपी कारागृहात जाऊन भेटल्याचेही समोर आहे. मात्र, पोलीस येरवडा कारागृहात जाईपर्यंत तो सुटला होता. त्याला पकडल्यानंतर एलसीबीतील अधिकाऱ्यांचा नक्की सहभाग स्पष्ट होणार आहे. पुरावे हाती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.