मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीला सामोरे जात असलेल्या ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांना त्यांच्या देहू गावातील ग्रामस्थांनी व्याख्यानमालेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. या वेळी बोलताना भक्तीपंथाचे महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या देहूला सांस्कृतिक तसेच राजकीय वारसा असल्याचे सांगितले.
देहूतील प्रा. रामकृष्ण मोरे सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित ११ व्या रामकृष्ण मोरे स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य होत्या. या वेळी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, तसेच साहित्य परिषदेचे  प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, राजन लाखे, रामदास महाराज मोरे, दत्तात्रय अत्रे, सुनील कंद आदी यावेली उपस्थित होते. या वेळी ग्रामस्थ तसेच विविध वक्त्यांनी डॉ. मोरे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. मोरे म्हणाले, देहू हे पंढरपूरनंतरचे भक्तीपंथाचे महत्त्वाचे केंद्र राहिले असून राजकीयदृष्टय़ा जागरूक गाव आहे. या गावाने कार्यकर्त्यांपासून मंत्र्यांपर्यंतचे योगदान दिले आहे. त्यामुळे देहूला केवळ सांस्कृतिक नव्हे तर राजकीय वारसाही आहे. वैद्य म्हणाल्या, मराठी साहित्य परिषदेच्या निमित्ताने प्रथमच मराठी भाषा घेऊन हिंदूी प्रदेशात जात आहोत. त्यामुळे हिंदूी व मराठी भाषेतील पूल बांधण्याचे काम होईल. भाषेचा व जातीपातीचा भेदाभेद विसरून मराठी पाऊल पुढे पडावे, हा संमेलनाच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे. कांबळे म्हणाले, माणसाला तंत्रज्ञानाबरोबर विज्ञानाचाही उपयोग होतो आहे, यासाठी रामकृष्ण मोरे यांनी काळाची गरज ओळखली आणि इंग्रजीचा क्रांतिकारी निर्णय घेतला. या जगात जगण्यासाठी इंग्रजीची खिडकी ही वापरावीच लागणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक दत्तात्रय अत्रे यांनी केले. सूत्रसंचालन उमेश टिजगे यांनी केले.